जिल्हा परिषद शाळांना विविध सुविधांसाठी अधिकचा निधी देणार – आमदार अतुल बेनके

“तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२३” प्रदान

नारायणगाव :- (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
जुन्नर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांना विविध भौतिक सुविधांसाठी भरघोस निधी देणार असल्याचे प्रतिपादन आमदार अतुल बेनके यांनी केले .जुन्नर तालुक्यातील प्राथमिक शाळांमध्ये ज्ञानदानाचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना पंचायत समिती जुन्नरच्या वतीने “तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२३” प्रदान कार्यक्रम प्रसंगी ते नारायणगांव येथे बोलत होते. जुन्नर तालुक्यातील शाळांचा दर्जा हा उत्तम असून भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी आमदार म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जुन्नर तालुक्यातील अधिकाधिक शिक्षक बंधू-भगिनींना गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळावा व जुन्नर तालुका शैक्षणिक गुणवत्तेत प्रथम क्रमांकावर यावा असे आवाहन जिल्हा नियोजन समिती सदस्या आशाताई बुचके यांनी केले.
याप्रसंगी विघ्नहर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक घोलप, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचे बंधू सागर कोल्हे, कृषिरत्न अनिलतात्या मेहेर यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य विकास दरेकर,ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, माजी पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाळे, विक्रांत नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष वाजगे, सचिव निलेश गोरडे, देवीचंद कटारिया,आनंद कटारिया, सहाय्यक गटविकास अधिकारी निलेश बुधवंत, गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे ,सर्व विस्तार अधिकारी ,केंद्रप्रमुख, सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .


तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकात जुन्नर तालुक्यातील शैक्षणिक कार्याचा आढावा सादर केला. गुणवत्तेत जुन्नर तालुका अग्रेसर असून शिक्षक बंधू-भगिनींच्या सहकार्यातून तालुका पहिल्या क्रमांकावर नेणार असल्याचे सांगितले. तालुक्यातील ५५ शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यात आला असून सहा शिक्षकांना शिष्यवृत्ती मार्गदर्शक पुरस्कार, तसेच गुणवंत शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, कर्मचारी, परसबाग स्पर्धेतील विजयी शाळा ,अध्यक्ष चषक पुरस्कार शाळा, जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला .जिल्हा परिषद शाळा आळेफाटा व राजुरी यांना आमदार चषक घोषित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विक्रांत नागरी सहकारी पतसंस्था नारायणगाव, बडासाब कलेक्शन ,ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठान नारायणगाव, कलासगर मंगल कार्यालयाचे सुनिल भुजबळ,सर्व विस्तार अधिकारी ,केंद्रप्रमुख ,सर्व शिक्षक संघटना पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनुपमा पाटे व भाऊसाहेब खाडे यांनी केले ,तर आभार केंद्रप्रमुख संजय जाधव यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *