जागतिकीकरणाशी यशस्वी स्पर्धा करणारी ग्रामोन्नती मंडळ ही ग्रामीण भागातील आदर्श शैक्षणिक संस्था – कवी प्रदीप निफाडकर

नारायणगाव ( किरण वाजगे, कार्यकारी संपादक )

नारायणगाव (ता. जुन्नर) येथे गुरुवर्य नानासाहेब सबनीसांसारख्या कर्मयोगी महामानवांचा सहवास अनुभवणारी पिढी खरोखरच भाग्यवान आहे. सबनिसांनी सांगितलेल्या एकाग्रता, श्रमप्रतिष्ठा मूल्यांना स्वीकारून जीवन जगल्यास कोणतीही समस्या उद्भवणार नाही. गुरूंचे स्मरण करणाऱ्या पवित्र भूमीमध्ये येण्याचं भाग्य मला लाभले. जागतिकीकरणाशी यशस्वी स्पर्धा करणारी ग्रामोन्नती मंडळ ही ग्रामीण भागातील आदर्श शैक्षणिक संस्था आहे असे मनोगत प्रसिद्ध गझलकार,कवी प्रदीप निफाडकर यांनी व्यक्त केले. ग्रामोन्नती मंडळ नारायणगाव यांच्या वतीने संस्थेचे संस्थापक गुरुवर्य नानासाहेब तथा रा.प.सबनीस यांच्या 63 व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेल्या अभिवादन सभेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी ग्रामोन्नती मंडळाचे विश्वस्त डॉ.श्रीकांत विद्वांस, अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर,निवृत्त प्रशासकीय अधिकारी सुखदेव बनकर, सबनीस साहेबांचे पुतणे विजय सबनीस व सौ.उषा सबनीस,उपाध्यक्ष सुजित खैरे,कार्यवाह रविंद्र पारगावकर,उपकार्याध्यक्ष डॉ.आनंद कुलकर्णी,सहकार्यवाह अरविंद मेहेर,संचालक सोमजीभाई पटेल,शशिकांत वाजगे, तानाजी वारुळे, अल्हाद खैरे,डॉ.संदीप डोळे,रमेश जुन्नरकर,रत्नदीप भरवीरकर,ऋषिकेश मेहेर,देवेंद्र बनकर,एकनाथ शेटे,देविदास भुजबळ, मुख्याध्यापिका अनुराधा पुराणिक, उपप्राचार्य हनुमंत काळे,मनसे जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे,महेश शिंदे,रत्नाकर सुबंध
इत्यादी मान्यवरांसह विद्यार्थी,शिक्षक,नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

‘मोबाईल आणि टीव्हीच्या वाढत्या प्रभावामुळे विद्यार्थ्यांचे वाचनाकडे दुर्लक्ष झाले आहे. अशाप्रसंगी वाचनाची परंपरा जतन करण्यासाठी सबनीस विद्यालयातील समृद्ध ग्रंथालय इतरांसाठी आदर्श असे आहे. शिक्षकांनी काय शिकवावे याबरोबर काय शिकवू नये याचेही ज्ञान ठेवणे गरजेचे आहे’असेही यावेळी कवी निफाडकर यांनी सांगितले.
कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर यांनी जागतिकीकरणाशी स्पर्धा करण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांनी तयार राहावे, त्यासाठी आवश्यक असणारी सर्व मदत ग्रामोन्नती मंडळ विद्यार्थ्यांसाठी करीत असल्याचे यावेळी सांगितले.
या कार्यक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते प्रा.डॉ.सौ. मंगल डोंगरे लिखित ‘संत तुकारामांचे विचारधन’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच गुरुवर्य सबनीसांचे पुतणे विजय सबनीस व सौ.उषा सबनीस यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमात विजय सबनीस, प्रा.डॉ.सौ.मंगल डोंगरे,सुधांशू ऋतुपर्ण मेहेर यांचीही भाषणे झाली.प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा.डॉ. मिलिंद कसबे यानी करुन दिली.
सकाळी गुरुवर्यांच्या प्रतिमेची मिरवणूक नारायणगाव बाजारपेठेतून काढण्यात आली होती. तद्नंतर गुरूवर्यांच्या समाधीचे पूजन होवून प्रसाद वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक सतीश तंवर यांनी केले व सूत्रसंचालन अनुपमा पाटे व सुनील ढवळे यांनी केले व आभार कार्यवाह रवींद्र पारगावकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *