पिंपरी :- गणेश विसर्जनासाठी महापालिका सज्ज असून शहरातील प्रमुख गणेश विसर्जन घाटांवर गणेश मंडळांसाठी तसेच नागरिकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सुसज्ज रुग्णवाहिका तसेच वैद्यकीय पथके तैनात ठेवण्यात आली आहे. तसेच इतर घाटांवरही जीवरक्षक, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा पथक नेमण्यात आले आहेत, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे.
यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता पर्यावरणाचे रक्षण करत सुरक्षित व उत्साहाच्या वातावरणात पार पडावी यासाठी महापालिकेच्या वतीने विविध सेवा सुविधा पुरवण्यात येत आहेत. काळेवाडी मधील स्मशान घाट,निगडी प्राधिकरणातील गणेश तलाव, चिखली स्मशान घाट, पिंपळे गुरव घाट, वाकड गावठाण घाट, मोशी नदी घाट, थेरगाव पूल नदी घाट, वाल्हेकरवाडी मधील जाधव घाट, सुभाषनगर पिंपरी घाट आणि सांगवी येथील वेताळबाबा मंदिर घाट याठिकाणी वैद्यकीय साहित्य, औषधे आणि सुसज्ज रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. या वैद्यकीय पथकांमध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ब्रदर, वॉर्ड बॉय, रुग्णवाहिका वाहनचालक सफाई कामगार आदींचा समावेश आहे. गणेश विसर्जनाच्या नवव्या दिवशी आणि दहाव्या दिवशी म्हणजेच म्हणजेच दि. २७ सप्टेंबर आणि २८ सप्टेंबर या कालावधीत विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथक कार्यरत राहील, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली आहे.
स्वयंसेवी संस्थांमार्फत मूर्ती संकलन केले जात असून महापालिकेच्या वतीने गणेश विसर्जन घाटांवर कृत्रिम विसर्जन हौद उभारण्यात आले आहेत, तसेच निर्माल्य संकलनासाठी निर्माल्य कुंडांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. अग्निशमन विभागाच्या वतीने शहरातील २६ विसर्जन घाटांवर लाईफ जॉकेट, रिंग, गळ, बोट, मेगा फोन, दोरी अशा रेस्क्यू साहित्यासह अग्निशमन पथक तैनात ठेवण्यात आले आहे. क्षेत्रीय कार्यालयांमार्फतही कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून संबधित गणेश विसर्जन घाटांवर आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली आहे.