अजित पवार हे अस्वस्थतेतून बोलत आहेत, सरकारवर आरोप करण्याची केविलवाणी धडपड आहे; अजित पवारांच्या टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१५ नोव्हेंबर २०२२


एकनाथ शिंदे सरकारच्या दबावतंत्रावर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी टीका केली. राज्यातील पोलिस यंत्रणेवर सरकारचा दबाव असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. तसेच राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यादरम्यान होणाऱ्या बैठकांवरही अजित पवार यांनी टीका केली. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अजित पवार हे अस्वस्थतेतून बोलत आहेत. विरोधी पक्षनेत्याचा अधिकार म्हणून सरकारवर आरोप करण्याची केविलवाणी धडपड आहे. महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री तर काचेच्या भिंतीत होते. त्यांना काही माहितीच नव्हतं. ज्या सरकारच्या बैठका होत नव्हत्या, फेसबुक लाईव्ह होतं, कॅबिनेटच्या बैठकाही फेसबुकवर होत होत्या, अधिकाऱ्यांच्या बैठकी तर सोडाच.. त्यामुळे त्या लोकांनी बैठकांवर बोलू नये असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय.

अडीच वर्षात जेवढे निर्णय घेतले नाही, तेवढे निर्णय गेल्या तीन महिन्यात फडणवीस आणि एकनाथ शिंदे सरकारने घेतले. महाराष्ट्राच्या विकासाकरिता सर्व बाबी या सरकारच्या माध्यमातून होत आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी एवढ्या लहान विषयावर बोलू नये. तुम्हाला शोभा देत नाहीत, असं बावनकुळे म्हणाले. तुम्ही कमजोर होते, तुमचे मुख्यमंत्री कमजोर  होते. तुम्ही विदर्भ, मराठवाडा वैधानिक मंडळं काढले. आकसाचं राजकारण केलं. सत्तेचा वापर पार्टी वाढवण्यासाठी केला. राष्ट्रवादी काँग्रेस कसा वाढेल हेच तुम्ही पाहिलं, असा घणाघातही बावनकुळे यांनी केला


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *