जुन्नर : संपूर्ण जून महिना हिवताप प्रतिरोध महिना पाळवा असे आरोग्य अधिकारी डॉ.वर्षा गुंजाळ यांनी केले जनतेला आव्हान

तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वर्षा गुंजाळ यांनी डासांद्वारे  पसरणाऱ्या आजारांना आळा बसवण्याचे आणि संपूर्ण जून महिना हिवताप प्रतिरोध महिना पाळवा असे जनतेला केले आव्हान.

जून हा हिवताप प्रतिरोध महिना असल्याने जुन्नर तालुक्यात सर्व नागरिकांनी परिसराची स्वच्छता करून  आरोग्य विभागाला सहकार्य करावे. तसेच आपल्या तालुक्यात काही भागात पावसाचे प्रमाण भरपूर असल्याने  बऱ्याच ठिकाणी पावसाळ्यात पाणी साठून राहते, त्या साचलेल्या पाण्यामध्ये मच्छरांची पैदास होऊन हिवताप डेंग्यु,चिकूनगुन्या,जेई,झिका हत्तीरोग इत्यादी प्रकारचे आजार  संभवतात. हिवताप,डेंग्यु सारख्या आजारामुळे रुग्ण दगावण्याची सुद्धा शक्यता असते.यासाठी खालील मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे असे डॉ.वर्षा गुंजाळ यांनी सांगितले आहे.

डासांची घनता वाढल्यास नगरपालिका, ग्रामपंचायत यांचे मार्फत घराघरात  पायरेथ्रम किंवा किंगफॉग  या औषधांची  शास्त्रीय पद्धतीने धुरळणी करणे गरजेचे आहे.
आरोग्य सेवक यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहकार्याने  गुणवत्तापूर्वक  साथरोग सर्वेक्षण करावे.
आरोग्य कर्मचारी सर्वेक्षणास घरोघरी आल्यास नागरिकांनी  त्यांना सहकार्य करावे व आपल्या घरात सात दिवसापेक्षा जास्त दिवस पाणी  साठणार नाही याची खबरदारी घ्यावी. यासाठी  पूर्ण गावात आठवड्यातुन एक दिवस कोरडा दिवस पाळण्यात यावा.
नवीन बांधकाम असलेल्या ठिकाणी पाणी साठणार नाही याची बांधकाम विकसकांनी  काळजी घ्यावी.
पावसाळ्यात आपल्या परिसरात पाणी साठणार नाही  याची घरातील सदस्यांनी काळजी घ्यावी.
खिडक्यांना  डास प्रतिबंधात्मक जाळ्या बसवाव्या.
नगरपालिका अथवा ग्रामपंचायत यांनी शहरातील अथवा गावातील शौचालयाच्या व्हेन्ट पाईपला जाळ्या बसवाव्यात.
तुंबलेले ओढे नाले, गटारी वाहती करावीत
कुलर, कुंड्या,फ्रिज,जुने टायर,तुळशी वृंदावणे, पत्र्यावरील अथवा टेरेस वरील टाकाऊ साहित्यात (भंगार) पाणी साठणार नाही याची  काळजी घ्यावी.
डास चाऊ नये म्हणून बाजारात असलेल्या डास प्रतिबंधत्मक साधनांचा वापर करावा.
थंडी,ताप,उलटी,मळमळ, तीव्र डोकेदुखी, हाता पायावर लालसर पुरळ, चक्कर येणे, सांधेदुखी  इत्यादी सारखे  लक्षणे दिसल्यास घाबरून न जाता त्वरित वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. स्वतः  कोणत्याही प्रकारचे औषधोपचार सुरू करू नये.
तालुका आरोग्य पर्यवेक्षक  दिलीप कचेरे यांच्या हसत खेळत डासांवर पाळत या व्याख्याना द्वारे जुन्नर तालुक्यात अनेक ठिकाण  जनजागृती झाले असल्याचे डॉ. वर्षा गुंजाळ यांनी सांगितले.तसेच तालुक्यातील आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्य कक्षेत कीटकजन्य आजार व जलजन्य आजार  होणार नाही या साठी तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका  यांना सूचना दिल्या आहेत. या कार्यक्रमात  जनतेने सहभाग घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच खाजगी स्वयंसेवी संस्थेने सुद्धा या कामी योगदान द्यावे असे आवाहन केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *