रांजणगावच्या उद्योजकाला सव्वा कोटीचा गंडा घालणाऱ्या महिलेसह तिच्या पतिवर गुन्हे दाखल

शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील उद्योजकाबाबत एक खळबळजक घटना घडलेली असुन, तो उद्योजक एका महिलेच्या हनी ट्रॅप चा शिकार झालाय. परंतु शेवटी हे प्रकरण सहन न झाल्याने व वारंवार होणाऱ्या आर्थिक व मानसिक त्रासामुळे या व्यक्तीने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे पुरावे सादर करत तक्रार दाखल केली आहे.
रांजणगाव गणपती येथील व्यावसायिक दयानंद निळोबा फंड यांची काही वर्षांपूर्वी, चऱ्होली येथील भूखंड खरेदीच्यावेळी रक्षणी उर्फ गौरी शेंडकर या महिलेची ओळख झालेली होती. या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले. त्यानंतर या महिलेने स्वतःच्या आजारपणाच्या कारणास्तव काही रक्कम फंड यांच्याकडून घेतली. पुढे फंड यांचे या महिलेच्या वडगाव धायरी, पुणे येथील घरी येणे जाणे सुरू राहिले. या महिलेने अश्लील मेसेज व अश्लील फोटो व्हॉट्स ॲप च्या माध्यमातून पाठवीत फंड यांना जाळ्यात ओढले. त्यातून सुमारे दीड वर्षात सव्वा कोटी रुपये रोख व बँकेच्या माध्यमातून घेऊनही त्या महिलेचे समाधान न झाल्याने, शेवटी फेब्रुवारी २०२३ मध्ये पन्नास लाख रुपयांची मागणी करणाऱ्या व पुढेही वेळोवेळी पैशांची मागणी करणाऱ्या रक्षणी उर्फ गौरी हिरामण शेंडकर, रा. भवंतक बिल्डिंग, धायरी, पुणे हिच्यावर व तिला मदत करणारा तिचा पती हिरामण केरबा शेंडकर या दोघांवर गुन्हा दाखल करण्याचा फंड यांनी मनाचा नीच्छय करत शेवटी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. त्यानुसार भा द वी का क ३८४, ३८५ व ३४ अंतर्गत या दोघांवर गुन्हे दखल करण्यात आलेत.

 


याबाबत सविस्तर माहिती अशी की, रक्षणी शेंडकर हीने पोटाच्या आजारपणातील शस्त्रक्रिया करायची असल्याचे सांगून फंड यांच्याकडे एक लाख रुपयांची मदत मागितलेली होती. फंड यांनीही सदर मदत केली होती. अशाप्रकारे या दोघांत मैत्री निर्माण झाली. मैत्रीच्या नात्याने काही फोटोही काढले होते. मात्र त्यानंतर काही दिवसातच तिने तिचे काही फोटो उद्योजकाला पाठवून, नंतर पतीने ते सर्व पाहिले असून मला तो त्रास देतोय. तुझ्यावर तो चिडला असून तो काहीही करू शकतो, असा धाक दाखवत पंधरा लाख रुपयांची मागणी केली. पुढे असाच प्रकार चालू ठेवत आणखी काही काढलेले खाजगी फोटो व्हायरल करेल अशी धमकी देत पैशांची मागणी चालूच ठेवली. नंतर पुन्हा सदर महिलेने फंड यांना धाक दाखवत, पतीच्या मदतीने आपले फोटो गावातील लोकांना पाठवेल व तुझ्यावर ॲट्रॉसिटी व बलात्काराची केस करेल अशा सतत धमक्या देत, तब्बल एक कोटी पंधरा लाख रुपये उकळलेत. दरम्यान २९ जुलै २०२२ रोजी रक्षणी हीने स्वतःच्या नावे धायरी येथून ५००/- रू चा सरकारी स्टॅम्प घेऊन, माझे व दयानंद फंड यांच्यातील नाते कायमचे संपले असल्याचे राजेखुशी लिहून दिलेले होते. असे असतानाही रक्षणी हीने रांजणगाव येथे येऊन पन्नास लाख रुपयांची मागणी केली. त्यावेळी तिची समजूत काढत फंड यांनी तिला पुन्हा माघारी पाठवून दिले होते. परंतु त्यानंतरही वेळोवेळी पैशांची मागणी करत, ॲट्रोसिटी व बलात्काराच्या केसमध्ये अडकवण्याची भीती दाखवून आणखी पन्नास लाख रुपयांची मागणी करत आल्याने व या त्रासाला कंटाळून, फंड यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने, रक्षणी उर्फ गौरी हिरामण शेंडकर व हिरामण केरबा शेंडकर दोघे रा. भवंतक बिल्डींग धायरी पुणे या दांपत्यावर गुन्हे दाखल करत रक्षणी उर्फ गौरी हिरामण शेंडकर हिला अटक केलेली असून, तिचा पती हिरामण मात्र अद्याप फरार असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *