कुकडी च्या पाण्यासाठी ठिय्या!…येडगाव धरणावर भर उन्हात आंदोलन सुरू

नारायणगाव (किरण वाजगे)
कुकडी प्रकल्पात निचांकी पाणीसाठा शिल्लक असल्याने व शेती सिंचनासाठी कुकडी डावा कालव्यात आजपासून उन्हाळी आवर्तन सोडू दिले जाणार नाही. पाणी सोडल्यास येडगाव धरण जलाशयात जलसमाधी घेऊ असा इशारा दिला आहे.
शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी व जुन्नर तालुक्यातील पूर्व पट्यातील चार गावच्या नागरिकांनी येडगाव जलाशयावर आज दि. २२ पासूनच जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देत ठिय्या आंदोलन सुरू केले. जुन्नर तालुक्यातील आणे, शिंदेवाडी यासह ४ गावातील नागरिकांनी यापुढे सर्व निवडणूकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
या आंदोलनात राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, किसान संघाचे अध्यक्ष डॉ दत्ता खोमणे, शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक अंबादास हांडे, तालुकाध्यक्ष संजय भुजबळ, अजित वाघ, प्रमोद खांडगे, रघुनाथ लेंडे, उपसरपंच बाळासाहेब दाते, तसेच नळावणेचे सरपंच अर्चना उबाळे, शिंदेवाडी, आणे गावच्या सरपंच प्रियंका दाते,पेमदरा या गावचे सरपंच व ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या आंदोलनस्थळी आमदार अतुल बेनके, माजी आमदार बाळासाहेब दांगट, भाजपच्या नेत्या आशाताई बुचके, संतोष नाना खैरे, कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर, यांनी सायंकाळी भेट दिली.
यावेळी आमदार बेनके व आशाताई बुचके यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना मोबाईल द्वारे संपर्क साधल्या नंतर त्यांनी येत्या २५ मे रोजी याबाबत बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ९ मे २०२३ रोजी पुणे येथे कालवा सल्लागार समितीची बैठक झाली होती. यावेळी येडगाव धरणातून कुकडी डावा कालव्यात दि. २२ मे पासून उन्हाळी दुसरे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पिंपळगाव जोगे धरणातील ३ टीएमसी, डिंभे व माणिकडोह धरणातून ०.५ टीएमसी पाणी येडगाव धरणात सोडून हे पाणी कुकडी डावा कालव्यात सोडण्याचे नियोजन केले होते. मात्र कुकडी प्रकल्पातील पाणीसाठा तालुक्यातील सिंचन व बिगर सिंचनासाठी राखून ठेवून उर्वरित पाणी २५ मे पासून कुकडी डावा कालव्यात उन्हाळी दुसरे आवर्तन सोडण्याचा निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत पुणे येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

गावांचा थेट मतदानावर बहिष्कार….
तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील ४ गावातील ग्रामपंचायतींनी येत्या काळातील सर्व निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत केला आहे. हे सर्व गावकरी या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. आणे पठारावरील नळावणे, शिंदेवाडी, पेमदरा , आणे गावच्या ग्रामस्थांनी प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज या गावच्या नागरिकांनी कुकडी नदीवरील येडगाव धरणावर ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला.
आणे पठारावरील सर्व ग्रामपंचायतींनी २००६ पासून वेळोवेळी ग्रामसभेचे ठराव घेऊन या भागासाठी उपसा सिंचन योजना राबवावी अशी मागणी सातत्याने केली आहे. दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर आणे पठार विकास संस्थेची उभारणी केली. यासाठी पठारवासियांनी मतदानावर बहिष्काराचे अस्र बाहेर काढले आहे. आणे पठाराचा कुकडी प्रकल्पात समावेश करून सर्वेक्षणाचे काम तातडीने हाती घ्यावे अशी मागणी देखील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *