गुरुवर्य सबनीसांसारख्या कर्मयोगींनी भारत घडविला – शेखर गायकवाड

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
०१ ऑक्टोबर २०२२

नारायणगाव


गुरुवर्य रा.प.सबनीस, कर्मवीर भाऊराव पाटील यांसारख्या कर्मयोगींनी भारत घडविला आहे. ग्रामीण क्षेत्रांमध्ये स्वातंत्र्यपूर्वकाळात शिक्षणाची संधी निर्माण करून समाजातील सामान्य घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य अशा महापुरुषांनी केले आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःची स्पर्धा स्वतःबरोबर करावी.इतरांशी तुलना न करता स्वतःची ओळख स्वतः निर्माण करावी, असे मनोगत महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले. ग्रामोन्नती मंडळ नारायणगाव यांनी आयोजित केलेल्या गुरुवर्य रा.प.सबनीस यांच्या बासष्टाव्या पुण्यतिथी निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून श्री. गायकवाड बोलत होते.

ग्रामोन्नती मंडळातर्फे निवृत्त शिक्षकांचा सन्मान

यावेळी ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर,उपाध्यक्ष सुजित खैरे, कार्यवाह रवींद्र पारगावकर, विश्वस्त डॉ.श्रीकांत विद्वांस, सहकार्यवाह अरविंद मेहेर, संचालक सोमजीभाई पटेल, शशिकांत वाजगे, तानाजी वारुळे, आल्हाद खैरे,रत्नदीप भरविरकर, डॉ.संदीप डोळे, एकनाथ शेटे,ऋषिकेश मेहेर, देविदास भुजबळ, माजी विद्यार्थी संघाचे सचिव रत्नाकर सुबंध, महेश शिंदे, ग्रामोन्नती मंडळाचे सर्व विभाग प्रमुख,माजी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “आयुष्य असे आहे की जिथे शिक्षण संपत नाही, जगताना आव्हाने स्वीकारत जगा.जगण्यातली कृत्रिमता सोडून नैसर्गिक जगा. लहानपणापासूनच चांगुलपणाची कास धरा, असेही श्री.गायकवाड यांनी यावेळी सांगितले “गुरुवर्य नानासाहेब सबनीसांनी उपलब्ध साधन संपत्तीचा वापर करून व्यावसायिक शिक्षणाची संधी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी निर्माण केली.शेतकरी समाजाचा अन्नदाता आहे, रक्ताचे पाणी करून शेती पिकविणाऱ्या शेतकऱ्याचे दारिद्र्य घालविले पाहिजे, असे सबनीस साहेब नेहमी सांगत ” असे मनोगत ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर यांनी व्यक्त केले.


यावेळी गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिरातून निवृत्त झालेले माजी मुख्याध्यापक रवींद्र वाघोले, हरिश्चंद्र नरसुडे,उपप्राचार्य बबनराव पावडे , आर.एल.घोलप,अनिल गायकवाड,दत्तात्रय राऊत, आर.बी.शिंदे,शहाजी पाचोरे, दिनकर जाधव,सौ.उर्मिला थोरात यांचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी रवींद्र वाघोले, सानिका जाधव, सई महामुनी यांचीही भाषणे झाली. सकाळी गुरुवर्य नानासाहेब सबनीसांच्या प्रतिमेची मिरवणूक मुख्य बाजारपेठ मार्गे काढण्यात आली. मिरवणुकीत विरोबा मित्र मंडळ पाटे आळी, शिवरुद्र मित्र मंडळ शिवविहार,स्वरगर्जना कोल्हे मळा, नवशक्ती मित्र मंडळ वारूळवाडी,आणि गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर यांच्या ढोल ताशा पथकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.

ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, संचालक एकनाथ शेटे आणि लोकनियुक्त सरपंच योगेश (बाबू) पाटे व इतर मान्यवरांच्या हस्ते नानासाहेब सबनीसांच्या समाधीचे पूजन करण्यात येवून सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य शरद घोडेकर यांनी केले व आभार कार्यवाह रवींद्र पारगावकर यांनी मानले. सूत्रसंचालन सुनील ढवळे आणि अनुपमा पाटे यांनी केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *