चिंचवड विधानसभा निवडणूक बिनविरोध होणार की महाविकास आघाडी उमेदवार देणार ?

अतुल परदेशी : मुख्य संपादक

पिंपरी-चिंचवड
दि.19/01/2022

 

चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे तीन जानेवारी रोजी निधन झाले.तसेच भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने कसबा विधानसभा आणि पिंपरी-चिंचवड या दोन ठिकाणच्या पोटनिवडणुका निवडणूक आयोगाने घोषित केल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये सहानुभूती म्हणून या दोन्ही जागा ज्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत त्या ठिकाणी महाविकास आघाडी आपला उमेदवार देईल का? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले असणार आहे. कारण काही दिवसांनंतरच महापालिकेची निवडणूक होणार आहे.

अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीने आपला उमेदवार देऊन ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा उमेदवार विजयी झाला तर याचा निश्चित फायदा महाविकास आघाडीला होईल. पण आता यात ही जागा महाविकास आघाडीतून कोण लढवणार हे पहाणे महत्त्वाचे असणार आहे. तसे पाहिले  तर कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे; आणि चिंचवड विधानसभा त्याठिकाणी भाजपचे लक्ष्मण जगताप हे जरी आमदार होते तरी एकेकाळी लक्ष्मण जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस, पवारांचे अतिशय निकटवर्तीय होते. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. जरी भाजपचे लक्ष्मण जगताप या मतदारसंघातून  हे निवडून आलेले असले तरी चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये आजही बऱ्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा मतदार आहे. अशा परिस्थितीमध्ये लक्ष्मण भाऊ यांचे निधन झाल्यानंतर त्या ठिकाणी रिस्पेक्ट विथ पॉलिटिक्स  पाहायला मिळून ती जागा त्या ठिकाणी जगताप कुटुंबाच्या वाट्याला बिनविरोध मिळते का? की; त्याठिकाणी महाविकास आघाडी आपला उमेदवार देऊन निवडून आणण्यासाठी प्रयत्न करते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  कारण 2024 ची विधानसभा निवडणूक लागायला बराचसा अवधी आहे. 2017 च्या आधी जी पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यामध्ये होती. ती महानगरपालिका 2017 च्या झालेल्या निवडणुकीमध्ये लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे विद्यमान आमदार महेशदादा लांडगे यांनी एकहाती ओढून आपल्या ताब्यात ठेवली आहे.

लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या निधनानंतर भारतीय जनता पार्टी समोर पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पुन्हा एकदा आपली सत्ता आणण्याच आव्हान निर्माण झालेल आहे. भोसरीचे आमदार तथा भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी देखील गेल्या काही वर्षांपासून पिंपरी चिंचवडकरांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करून अनेक कामे आजपर्यंत मार्गी लावलेली आहेत हे नाकारता येणार नाही. परंतु लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे या दोघांची जी जोडी होती या दोघांनी मिळून एकमेकांच्या विचाराने संपूर्ण शहराचा राजकारण सुरू होते. त्यामध्ये कुठेतरी आता महेश लांडगे यांना निर्णय घेताना स्वतःची अधिक ताकद लावावी लागणार आहे. या राजकीय परिस्थितीचा फ़ायदा राष्ट्रवादी काँग्रेस कशा पद्धतीने फायदा घेते यावर ब-याच गोष्टी अवलंबून आहेत.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असेल हा मुद्दाही महत्वाचा ठरणार आहे.  कारण आपण जर मागच्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर मागच्या झालेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातून लक्ष्मण जगताप यांच्यासमोर राहुल कलाटे हे उमेदवार होते. त्यांनी चांगली मते घेतली होती. पुन्हा एकदा महाविकास आघाडी म्हणून राहुल कलाटे यांच्या गळ्यात माळ पडते का ? की काही वेगळी खेळी करून  महाविकास आघाडीकडून वेगळा उमेदवार दिला जातो. हे पाह्णे महत्त्वाचे ठरेल.

आजपर्यंत महाराष्ट्राचे सुसंस्कृत राजकारण आपण पहात आलो आहोत. अनेक पोटनिवडणुका बिनविरोध झाल्याचे आपण पाहिले आहे. परंतु अलिकडे महाराष्ट्रातल्या राजकारणातली चिखलफेक, फोडाफोडीचे राजकारण पाहता राजकीय नेत्यांना एकमेकांबद्दल खूप आत्मीयता असल्याचे दिसत नाही. एकंदरीत सध्याच्या राजकारणाचा रागरंग पाहता चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आजमितीस वाटत नाही. कसबा मतदारसंघाबद्दल परिस्थिती थोडी वेगळी आहे. तेथे भाजपची एक वेगळी व्होटबँक आहे.हक्काचा मतदार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी महाविकास आघाडी आपला उमेदवार देऊन ताकद लावेल की नाही हे आत्ताच सांगणं कठीण होईल. मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा विचार करता अजित पवार निश्चितच चिंचवड विधानसभा मतदारसंघ आपल्या बाजूने खेचण्यामध्ये प्रयत्न करतील हे आता सांगायला काही हरकत नाही.

घोडा मैदान दूर नाही… निवडणूक आयोगाने  पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीत संदर्भात आपण जे आता आपला आवाज न्यूज नेटवर्क च्या माध्यमातून भाकीत वर्तवत आहोत त्यात कितपत यश अपयश येईल निवडणूक लागेल की बिनविरोध होईल… हे प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष निवडणुका लागतील त्या वेळेस लवकरच सर्व चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत या संपूर्ण राजकीय घडामोडींवरती आपला आवाजची नजर असणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *