दि. १९/०१/२०२३
पिंपरी
पिंपरी : नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसकडून कोणत्याही क्षणी निलंबनाची कारवाई होणार आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांनी आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरून काँग्रेसचं नाव आणि काँग्रेसचा लोगो हटवला आहे. सत्यजित तांबे हेच काँग्रेस सोडत असल्याची घोषणा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
त्यामुळे तांबे यांच्या या निर्णयाकडे लक्ष लागलं आहे. तसेच सत्यजित तांबे यांनी अद्याप भाजपकडे पाठिंबा मागितला की नाही? यावरही तर्कवितर्क लढवले जात असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंडखोरी झाली आहे. महाविकास आघाडी के दिल के टुकडे हुए हजार, कही कहाँ गिरा, तो कही कहाँ गिरा… अशी परिस्थिती महाविकास आघाडीची झाली आहे. सत्यजित तांबेंनी समर्थन मागितलं नाही.जर त्यांनी समर्थन मागितलं तर पार्लमेंट्री बोर्डाकडे संमती मागण्याचा प्रयत्न करू. पण त्यांनी समर्थन मागितलं नाही, असं सांगतानाच भाजप आता अपक्षाच्या भूमिकेत आहे. काळ ठरवेल आमचं समर्थन कुणाला असेल ते, असं सूचक विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं.
सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून काँग्रेस पक्षाला झटका दिला होता. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आम्ही सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नाही, असे जाहीर केले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सत्यजीत तांबे काय भूमिका मांडतात, हे पाहावे लागेल. ते उघडपणे भाजपचा पाठिंबा मागणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.