सत्यजित तांबे अन बाळासाहेब थोरात यांच्यात राजकीय ठिणगी टाकणारा ‘हा’ खरा सूत्रधार

दि. १७/०१/२०२३

पिंपरी

 

पिंपरी : राहुल गांधी यांच्याशी घनिष्ठ संबंध आणि काँग्रेसचे कडवट समर्थक म्हणवणाऱ्या तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.
गांधी आणि तांबे यांचा संपर्क इतका चांगला होता की नगर दौऱ्यावेळी राहुल गांधी यांनी तांबे यांच्या निवासस्थानी आवर्जून भेट दिली होती. मात्र आता तांबे पिता-पुत्राच्या निलंबनाचं फर्मान थेट हायकमांडकडूनच निघालं आहे.

5 तारखेला डॉ. सुधीर तांबे यांना आणि 16 तारखेला त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांचे निलंबन करण्यात आले आहे. हे दोन्ही नेते महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे आणि भाचे आहेत. त्यामुळे इतक्या गदारोळानंतरही बाळासाहेब थोरात अद्याप माध्यमांसमोर आले नाहीत.मात्र उमेदवारी गदारोळात काँग्रेस पक्षात भाच्यानं मामाची गोची केल्याची चर्चा रंगली आहे.

कारण मेहुणे आणि भाच्याच्या बंडावर थोरात मौन असल्यामुळे त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत.नाशिक पदवीधरचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबेच आहेत. म्हणजे थोरात यांचे मेहुणे. यावेळी सुधीर तांबे यांचे पुत्र सत्यजित तांबे तिकीटासाठी इच्छूक होते.मात्र त्यांच्याऐवजी काँग्रेसनं पुन्हा सुधीर तांबे यांनाच उमेदवारी दिली. सत्यजित तांबे यांची अनेक वर्षांपासून सक्रीय राजकारणात येण्याची धडपड सुरु आहे.तर दुसरीकडे संगमनेर मतदारसंघात बाळासाहेब थोरातांची कन्या जयश्री थोरात सुद्धा राजकारणाचे धडे गिरवू लागली आहे.

असं म्हणतात की मामा-भाच्यात पडलेल्या या ठिणगीचं मूळ संगमनेरच्या मतदारसंघातच आहे.एका बाजूला थोरातांची कन्या संगमनेरमध्ये सक्रीय होते आहे तर दुसरीकडे भाचा सत्यजित तांबे सुद्धा संगमनेरसाठी फिल्डिंग लावत असल्यामुळेच हा वाद उफाळून आल्याचे बोललं जातं आहे.नगर जिल्ह्यातल्या अनेक राजकीय घराण्यांनी सर्व पक्ष व्यापले आहेत. नगरचं राजकारण नात्यागोत्यांमध्ये कसं गुरफटलं हे पुढील नात्यागोत्याच्या राजकारणावरून लक्षात येतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *