मलठण जिल्हा परिषद शाळेचे इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

रवींद्र खुडे : विभागीय संपादक
शिरूर

 

शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या मलठण जिल्हा परिषद शाळेतील इ. ५ वी च्या १३ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले असून, त्यांना शाळेतील शिक्षिका कमल बोडरे व इतर शिक्षकांनी मार्गदर्शन केल्याची माहिती मुख्याध्यापक पाटीलबुवा मिडगुले यांनी दिली.

मलठण गावाला शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा फार मोठा इतिहास असुन, या गावातील अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत मोठ्या अधिकारी पदावर आहेत. त्याचप्रमाणे गावकऱ्यांमध्ये असणारी शिक्षणाची आत्मीयता व त्यातून ते विद्यार्थ्यांना देत असलेली बक्षिसरूपी प्रेरणा यामुळेच शिक्षणाचा दर्जा टिकून असल्याचे येथील जाणत्या लोकांनी आपला आवाज न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले.

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेमार्फत ही शिष्यवृत्ती परीक्षा ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात आली होती. त्यात राज्यभरातून इ. ५ वी चे ४ लाख १८ हजार ५५ विद्यार्थी बसलेले होते.

मलठण शाळेतील तनया अतुल थोरात, निष्ठा किसन मुळे, समृद्धी विजय कांदळकर, वेदांत विठ्ठल गायकवाड, तनिष्का शरद दंडवते, यक्षिता अनिल राजगुरू, संस्कृती विठ्ठल गोडसे, स्नेहल अनिल बारगळ, समृद्धी सत्यवान शिंदे, संस्कार राजेंद्र गावडे, प्रणव पांडुरंग दंडवते, श्रेया गणेश वाव्हळ व इक्रा रऊफ आतार हे विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले आहेत. या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा नुकताच येथे सत्कार करण्यात आल्याची माहिती, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संपत गायकवाड यांनी दिली.

कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्षा बेबीताई कदम, निवृत्त शिक्षक सुदाम गायकवाड यांनी मनोगतातून शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षक मिलिंद राजगुरू, भिवा गायकवाड, संगीता पळसकर, हेमलता बागले, रेखा पिसाळ, छाया गायकवाड, पद्माकर काळे, संतोष दंडवते व पालक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल माजी आमदार पोपटराव गावडे, युवा नेते राजेंद्र गावडे, पं स सदस्य डॉ सुभाष पोकळे तसेच मलठण चे सरपंच, उपसरपंच, ग्रा पं सदस्य व गावातील विविध आजी माजी पदाधिाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील या गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळ्यासाठी व नुतन वर्गखोल्या उद्घाटनासाठी दि. २३ जानेवारी रोजी उपस्थित राहणार असल्याचे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संपत गायकवाड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *