व्यावसायिकाच्या घरात दरोडा, साडेदहा लाखांचा ऐवज लुटला

दि. ११/०१/२०२३
तळेगाव दाभाडे


तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे येथे मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास किराणा दुकानदाराच्या घरात घुसून चार पाच दरोडेखोरांनी पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून तीन ते साडेतीन लाखांची रोकड आणि सोन्या- चांदीचे दागिने असा एकूण साडेदहा लाखांचा ऐवज लुटून नेला.

याप्रकरणी दिलीप चंपालाल मुथा (वय ५५, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे वडगाव मावळ येथे किराणा दुकान आहे. ते त्यांच्या पत्नीसह मंगळवारी वडगाव येथे त्यांच्या किराणा दुकानात गेले होते. जेवण करण्यासाठी ते दोघेही तळेगाव येथील घरी दुपारी दोनच्या सुमारास आले. त्यावेळी चार पाच अनोळखी मुथा यांच्या घरात घुसले.त्यांनी चेहऱ्यावर मास्क लावला होता. त्यांनी मुथा आणि त्यांच्या कुटुंबियांना पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखविला. त्यानंतर दरोडेखोरांनी मुथा यांच्या घरातील तीन ते साडेतीन लाखांची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिने असा एकूण साडेदहा लाखांचा ऐवज लुटून दरोडेखोर दुचाकीवरून पळून गेले.

या प्रकाराबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *