बहुआयामी, करारी आणि तेव्हढेच प्रेमळ व्यक्तिमत्व हरपले

दि. ०३/०१/२०२३
पिंपरी


चिंचवडचे भाजपचे जेष्ठ आमदार तथा पिंपरी चिंचवड शहराचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे आज मंगळवार दि ३ जानेवारी रोजी सकाळी बाणेर येथील ज्युपिटर रुग्णालयात दीर्घ आजाराने वयाच्या ५९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने पिंपरी चिंचवड शहरावर शोककळा पसरली आहे.

करारी असलेल्या भाऊंनी गेले दोन वर्षे मृत्यूला झुंज दिली होती. भाऊंना राजकारणात खऱ्या अर्थाने संधी मिळाली ती दिवंगत महापौर मधुकरराव पवळे यांच्या निधनानंतरच भाऊंची ओळख अण्णांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून होती. मधुकर अण्णा पवळे यांच्यानंतर पक्षात भाऊंचेच स्थान होते. अण्णांचे अचानक जाणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच या शहराला धक्का होता. अण्णानंतर सगळी सूत्रे भाऊंच्या हाती आली. महापौरपदाची माळ भाऊंच्या गळ्यात पडल्यावर भाऊंनी परत मागे वळून पहिलेच नाही.

भाऊ करारी होते याचा प्रत्येय शहराला आला तो महाविकास आघाडीचे सरकार असताना भाऊंनी शहरवासीयांना शास्तीकर माफ करावा यासाठी खूप प्रयत्न केले. त्यावेळी शास्तीकर माफ न झाल्याने वेगळी वाट धरत भाजपच्या गोटात सामील झाले. नित्य व्यायाम करणे, चालणे हे भाऊंच्या पहिलवानी शरीरयष्टीचे कारण होते पण काही वर्षानंतर त्यांना दुर्घर आजाराने ग्रासले तर त्याच्याशी त्यांनी दोन वर्षे झुंज दिली पण अखेर आज ३ जून रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

माझ्या आठवणीतले भाऊ

दैव जात दुःखे भरता
दोष ना कुणाचा !
पराधीन आहे जगती
पुत्र मानवाचा !!”

भाऊंचा स्वभाव करारी होताच पण कार्यकर्त्याना ताकद देणारा नेता म्हणून भाऊंची एक वेगळी ओळख या अख्या पिंपरी चिंचवडला नव्हे तर पुणे जिल्ह्याला ज्ञात होती. आपल्या भागाचा विकास केला तरच आपल्या भागात राहणाऱ्या नागरिकांना एक उंची प्राप्त होईल.हे त्यांनी ओळखले होते. त्यासाठी त्यांनी सुरवातीला पिंपळे गुरव आणि परिसराचा विकास करताना विभागातील रस्ते आणि दळणवळण, आरोग्य सेवा, ड्रेनेज, सुसज्ज रस्ते , पाणी , वीज पुरवठा या गोष्टी दुरदूरष्टी ठेऊन त्यांनी केल्या. शहराला जोडणाऱ्या सुसज्ज रस्त्याचे काम प्रथम हाती घेतले. पिंपळे गुरव हे पूर्वी गाव होते गावातील रस्ते अरुंद होते ते मोठे आणि सुसज्ज करण्यासाठी गाववाल्यांची बैठक घेतली आपण आपल्या गावाचा विकास केला तरच आपल्या जमिनींना भाव येतील आणि लोक येथे राहण्यासाठी पसंती देतील हे पटवून दिले. त्यासाठी पाहिले आपल्या भावकीच्या जमिनी रस्त्यांसाठी कामी आणल्या आणि सुरू झाला या भागाचा विकास आणि कायापालट.

त्यावेळी मला आठवते भोसरीचे आमदार विलास लांडे यांना भाऊ नेहमी म्हणायचे पहा तुझ्या नदीपलीकडे भोसरीमध्ये फ्लॅट साठी ७०० ते ८०० रु स्वेअर फूट भाव सुरू आहे तेच आमच्या पिंपळे गुरव मध्ये १००० ते १२०० रुपये भाव सुरू आहे त्यासाठी आपल्या भागाचा विकास करावा लागतो. आणि खरेच त्यानंतर त्यांनी कठोर निर्णय घेत कित्येक अतिक्रमणे काढून टाकली. आणि पुणे , मुंबई, ग्रामीण भागातील लोक पिंपळे गुरवला प्राधान्य देताना दिसले. असे दूरदृष्टी नेते म्हणजे भाऊ होते.

त्यानंतर त्यांनी शहराच्या विकासाकडे लक्ष देण्याची ठरवले आणि शहराचा विकास घडविण्यात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासोबत भाऊंचेही योगदान असल्याचे सर्वच मान्य करतात. शहराच्या विकासाबरोबरच क्रीडा आणि सांस्कृतिक धोरणांवर त्यांचे विशेष लक्ष होते. ते महापौर असताना अनेक क्रीडांगणे, मनोरंजनासाठी पिंपळे गुरव भागातील लोकांसाठी कै निळू फुले नाट्यगृहाची निर्मिती केली आणि शहरातील लोकांना विरंगुळा, मुलांना बागडण्यासाठी उद्याने उभारली. त्याचबरोबर तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार निर्मितीवर भर देण्याचे काम अखेरपर्यंत भाऊंनी केले.

भाऊंना ‘आपला आवाज न्यूज नेटवर्क’ व ‘आपला आवाज आपली सखी’ च्या परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली…


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *