आमदार लक्ष्मण जगताप अनंतात विलीन

दि. ०३/०१/२०२३
पिंपरी

पिंपरी : चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे आज मंगळवारी सकाळी दीर्घ आजाराने वयाच्या ५९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने शहरातील भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यामध्ये शोककळा पसरली. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव रुग्णालयातून घरी आणण्यात आले. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिकेने दुखवटा जाहीर करत अत्यावश्यक सेवा वगळता आपली सर्व कार्यालये बंद ठेवली.

दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगताप यांच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेतले. यावेळी विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे,पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील,महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,आरोग्यमंत्री तानाजी सावंत, माजी मंत्री विजय शिवतारे,भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे,मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके,माजी आमदार विलास लांडे व मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते आणि जनसमुदाय उपस्थित होता.आमदार जगताप यांच्या पार्थिवावर त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सजविलेल्या वैकुंठरथातून त्यांची अंत्ययात्रा ज्या ठिकाणी दाहसंस्कार केला जाणार आहे त्या ठिकाणाकडे जाण्यास निघाली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या हजारो नागरिकांनी त्यांना पाणावलेल्या डोळ्यांनी अखेरचा निरोप दिला. साडेसहाच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर दाहसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *