मावळात पर्यटकांची गर्दी, काळजी घेण्याचे शासनयंत्रणेचे आवाहन

दि. ३१/१२/२०२२
पिंपरी


पिंपरी : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मावळात पर्यटक मोठ्या संख्येने जमा झाले असून लोणावळा, कामशेत, पवनानगर परिसरात असलेली हॉटेल्स, रेस्ट हाऊसेस ‘फुल्ल’ झाली आहेत.

लोणावळा, खंडाळा परिसर ब्रिटिशांच्या काळापासूनच पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, मावळातील कामशेत पवनानगर सह अन्य ठिकाणेही आता पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येऊ लागली आहेत. पवनानगर धरण क्षेत्रात सध्या तंबूनिवासाचा ‘ट्रेंड’ आहे. दिवसभर भटकंती, मौजमजा केल्यानंतर रंगबिरंगी तंबूत रात्र घालविणे शहरात काँक्रीटच्या जंगलात राहणाऱ्या पर्यटकांना आवडते. याचा फायदा घेत या भागातील नागरिकांनी तंबूनिवासाचा व्यवसाय सुरू केला आहे. रेस्टहाऊस सारखा बांधणीचा मोठा खर्च करावा लागत नसल्यामुळे हा व्यवसाय कमी गुंतवणुकीत करता येतो. त्यामुळे गेल्या काही वर्षात या भागात तंबूनिवासांचे प्रमाण वाढले आहे.

यंदा मावळात मुंबई, पुणे येथील पर्यटक मोठ्या संख्येने आले आहेत. त्यामुळे मावळातील पर्यटन व्यवसाय व त्या आधारित व्यवसाय करणाऱ्याना सुगीचे दिवस आले आहेत. मात्र, त्याचा वेळी पोलीस, अबकारीकर खाते आणि वनविभागाच्या कर्मचाऱयांना डोळ्यात तेल घालून जागे रहावे लागणार आहे. पर्यटक मोठ्या संख्येने आपले की, वाहतूक कोंडी, सार्वजनिक शांतताभंग, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. बेकायदा मद्य विक्री होत असल्याने पोलिसखाते आणि अबकारीकर खात्याला ही परिस्थिती हाताळावी लागते. तसेच मावळतात मोठ्या प्रमाणात राखीव वन आहे. काही पर्यटक त्यात घुसून हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पर्यावरणाची हानी होण्याचा संभव असल्याने वनखात्याला जागरूक राहावे लागते.

या परिस्थितीच्या अनुषंगाने पोलिसांनी काही मार्गादर्शक सूचना जारी केल्या आहेत. धरण परिसरात कुठेही थांबून मद्यपान टाळावे, टेंटवर जाताना तो धरणग्रस्त शेतकरी आहे का याची खातरजमा करुन अशा टेंटवर मुक्काम करावा.त्यामुळे आपली काळजी घेतली जाईल, परिसरात रस्त्यावर गाडी पार्क करुन हुल्लडबाजी करणे टाळावे, धरण परिसराच्या पाण्यात जाणे टाळावे, अतिउत्साही तरुण जंगलात शेकोटी करतात परंतु त्यामुळे इतत्र आग लागणार नाही याची काळजी घ्यावी, परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही ठिकाणी अनुचित प्रकार घडत असल्यास ताबडतोब पोलिसांना कळवावे; अशा सूचना पोलीस खात्याने दिल्या आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *