टाकळीहाजी येथे अपघातात मायलेकी ठार तर मुलगा गंभीर जखमी – दोन्ही कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

रवींद्र खुडे
विभागीय संपादक 
१६ मे २०२२

शिरूर


शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील टाकळी हाजी-फाकटे रोडवर अपघात होऊन, या अपघातात मायलेकिंचा मृत्यू झाला आहे. तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या मालवाहू ट्रक ने त्यांना जोरदार धडक दिल्याने, यात जिजाबाई केरुभाऊ पळसकर (वय वर्ष ५२) या जागीच मृत्यु पावल्यात.तर त्यांची आई ताराबाई महादू साबळे (वय वर्ष ७३) यांचा शिरूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर भाऊ विलास महादू साबळे (वय वर्ष ४७) हे देखील गंभीर जखमी झालेले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की टाकळी हाजी येथील विलास महादू साबळे व त्यांची आई ताराबाई महादू साबळे हे टाकळी हाजी येथून मोटारसायकल वर साबळेवाडीकडे जात असताना, फाकटे रोडवर विलास यांची बहीण जिजाबाई केरभाऊ पळसकर रस्त्याने पायी चाललेल्या होत्या. तिला पाहिल्यानंतर विलास यांनी रस्त्याच्या कडेला गाडी थांबविली. विलास यांची आई ताराबाई व बहीण जिजाबाई या रस्त्याच्या कडेला दोघी बोलत असताना, पाठीमागून भरधाव वेगात ट्रक आला व त्या भरधाव ट्रकने या दोघींना व विलास बसलेला असलेल्या मोटार सायकलला धडक दिली. त्यात जिजाबाई यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर ताराबाई या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना तातडीने शिरूर येथे एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

दरम्यान अपघाताचे वृत्त समजताच लगेचच स्थानिकांनी ताराबाई व विलास या दोघाही जखमींना तातडीची मदत करत दवाखान्यात हलविले होते. ताराबाई यांना शिरूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु त्यांचाही तेथे उपचारादरम्यान दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यामुळे या दोन्ही कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावावर शोककळा पसरलेली आहे.

मालवाहू ट्रक क्र. ( एम. एच. १७ ओ. जी. ९२५९) पोलिसांनी ताब्यात घेतला असून, ट्रक चालक फरार झाला आहे. अपघाती वाहने टाकळी हाजी चौकीला आणुन लावलेली आहेत. सदरचा अपघात रविवार दि. १५ मे २०२२ ऐवजी सकाळी ८.४५ वा. चे सुमारास झाला आहे. या घटनेबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले करत आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *