शिवसेना फोडण्यात संजय राऊतांचा सिंहाचा वाटा – गिरीश महाजन

२६ डिसेंबर २०२२


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील तब्बल ४० आमदारांसह बंड पुकारलं होतं. त्यांच्या या बंडामुळे शिवसेनेला मोठं खिंडार पडलं. शिवसेनेत दोन गट पडले. शिवसेना नक्की कोणाची हा निर्णय आता कोर्टाच्या दरबारी असला तर अद्यापही दोन्ही गटातील वाद थांबलेला नाही. याच दरम्यान आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गट नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

गिरीश महाजन म्हणाले की, संजय राऊत यांचा शिवसेना फोडण्यात मोठा सिंहाचा वाटा आहे. ते ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मांडीवर जाऊन बसले, त्यांनी शिवसेनेला सुरुंग लावला, त्यामुळे कट्टर शिवसैनिक नाराज झाले. खऱ्या अर्थाने हे सरकार येण्याचं श्रेय त्यांचंच आहे. संजय राऊत हे एकनाथ शिंदे यांना मोठी मदत करत आहेत, शिवसेनेला सुरुंग लावण्याचं काम संजय राऊतच करत आहेत, असा धक्कादायक दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी आपण उद्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत नागपुरात जाऊन गौप्यस्फोट करणार असल्याचं विधान केलं होतं. त्यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, संजय राऊत नेहमीच बॉम्ब आणतात आणि ते फुसके निघतात. त्यांच्याकडे बोलण्याशिवाय दुसरं काही राहिलेलं नाही. मागच्यावेळी देखील त्यांनी असाच बॉम्ब तयार केला होता. पण साधा लोंगी फटाका देखील त्यांनी फोडला नाही, असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *