अजित पवारांनाच विधानसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावाची माहिती नाही; शिंदे गटाने लगावला टोला

३० डिसेंबर २०२२

नागपूर


राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास ठराव मांडल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.काही नेत्यांनी विधानसभा सचिवांना पत्र देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला.

गुरुवारी मविआच्या काही नेत्यांनी विधानसभा सचिवांना पत्र देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला. काँग्रेस आमदार सुनिल केदार, सुरेश वरपुडकर, शिवसेना आमदार सुनील प्रभू आणि राष्ट्रवादी काँघ्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी हे पत्र विधानसभा सचिवांना दिलं. विरोधी पक्षातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभागृहात बोलू न दिल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार म्हणाले की, मला अध्यक्षांविरोधातील या अविश्वास ठरावाबद्दलची काही कल्पना नाही. सध्या तरी अध्यक्ष एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेपर्यंत अशाप्रकारचा अविश्वास ठराव मांडता येत नाही. जर मी सहमती दर्शवली तर त्यावर माझी स्वाक्षरी आवश्यक असेल. मी या प्रकरणामध्ये नक्कीच लक्ष घालणार आहे.

अजित पवारांच्या वक्तव्यानंतर त्यावर शिंदे गटाकडून खोचक शब्दांत टोला लगावण्यात आला आहे. अजित पवारांचं वक्तव्य मी पाहिलं. खरंतर सभागृहात कामकाज पाहताना आधी आपल्या विरोधी पक्षनेत्याला विश्वासात घेऊन सर्व विरोधी सदस्यांनी गोष्टी करायला हव्यात. मात्र, विरोधकांमध्ये एकमेकांबद्दल विश्वासार्हता दिसत नाहीये. जर विरोधी पक्षनेते म्हणत आहेत की मला त्याबद्दल माहिती नाही, तर हे त्याचंच प्रतीक आहे, असं शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले आहेत.अजित पवारांचा स्वभाव स्पष्ट असतो. ते सरळ बोलतात. बेधडक बोलतात. ते कुणाकडूनच नसतात. जे खरं आहे त्या बाजूने ते असतात, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *