रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी दि २० मे २०२१
रुग्णांना उच्च दर्जाची व तत्पर सेवा देण्यास मनपाची रुग्णालये व प्रशासन सक्षम. आहेत असे ॲड.नितीन लांडगे म्हणाले. पिंपरी चिचंवड महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयात कोविड -१९ च्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. येथे दाखल करण्यात आलेल्या सर्व रुग्णांना उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा, सुविधा देण्यासाठी मनपाच्या वैद्यकीय विभागातील सर्व अधिकारी व कर्मचा-यांसह, पदाधिकारी तसेच प्रशासन अहोरात्र प्रयत्न करीत असते. येथे करण्यात येणा-या उपचारांसाठी कोणीही रुग्णालयातील कर्मचारी अथवा इतर व्यक्तींनी रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडे पैशाची मागणी केल्यास ताबडतोब पोलिसात तक्रार दाखल करावी किंवा संबंधित रुग्णालयाच्या वरिष्ठांकडे तक्रार दाखल करावी असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड.नितीन लांडगे यांनी केले आहे. पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात कोविड -१९ च्या रुग्णाला दाखल करण्यासाठी आळेफाटा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचा-याने पैशाची मागणी केली असल्याची तक्रार जुन्नर तालुक्यातील आळेफाटा पोलिस ठाणे (पुणे ग्रामिण पोलिस) येथे दाखल झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मनपाच्या सर्वच रुग्णालयात पिंपरी चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्यातील ग्रामिण भागातून आणि जिल्ह्याबाहेरुनही रुग्ण उपचारांसाठी दाखल होतात. आतापर्यंत अशा कोणत्याही रुग्णांकडून किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून मनपाच्या कोणत्याही कर्मचारी व अधिका-यांनी पैसे घेतल्याची एकही तक्रार आलेली नाही. तरी देखिल येथून पुढे मनपाच्या वैद्यकीय विभागासह इतर कोणत्याही विभागात मानधन अथवा ठेकेदारी पध्दतीने कर्मचा-यांची नेमणूक करताना त्यांच्याकडे ‘चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची’ (पोलिस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट) मागणी प्रशासनाने करावी अशी मागणी आपण आयुक्त साजेश पाटील यांच्याकडे करणार आहोत. तसेच मनपाच्या सर्व रुग्णालयांमध्ये व कोविड केअर सेंटर (ट्रिपल सी) मध्ये नागरीकांना दिसेल अशा दर्शनी भागात याविषयी जनजागृती करणारे फलक लावण्याबाबतही आयुक्तांकडे आपण मागणी करणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष अॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे यांनी दिली आहे.