महाराष्ट्रात होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण

दि .३०/१२/२०२२
नागपूर


नागपूर : महाराष्ट्रात 2022-23 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व क्रीडा मंत्री गिरीष महाजन, विधानसभा विरोधी पक्षनेते तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत नागपूर विधानभवनात करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सन 2022-23 ची माहिती

राज्यात क्रीडा संस्कृतीचे जतन करणे व क्रीडा वातावरण निर्माण व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सन 2022-23 चे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय खेळाडूंचा दर्जात्मक खेळ पाहण्याची संधी नागरिक व नवोदित खेळाडू यांना उपलब्ध व्हावी, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये राज्याचा नावलौकीक व अधिक पदके प्राप्त व्हावीत, यासाठी राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देणे व स्पर्धेच्या संधी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. यासाठी ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा’ आयोजित करण्यात येत आहेत.

राज्यात 23 वर्षानंतर अशा स्पर्धांचे आयोजन होत आहे. राज्य ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. दिनांक 2 ते 12 जानेवारी 2023 या कालावधीत 9 जिल्ह्यात 39 क्रीडा प्रकारात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत 3 हजार 857 पुरुष व 3 हजार 587 महिला खेळाडू असे एकूण 7 हजार 444 खेळाडू सहभागी होणार आहेत. क्रीडा मार्गदर्शक, व्यवस्थापक, पंच, स्वयंसेवक, तांत्रिक अधिकारी यांच्यासह एकूण 10 हजार 456 जणांचा सहभाग असणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *