…नेमकं कशाला घाबरत आहात ? अजित पवारांची शिंदे सरकारला विचारणा

अतुल परदेशी
मुख्य संपादक
०५ ऑगस्ट २०२२


राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप प्रलंबित असल्याने विधासनभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराजी जाहीर केली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी नेमकी कोणत्या गोष्टीची भीती आहे? अशी विचारणा अजित पवारांनी केली आहे. अजित पवारांचा बारामतीमध्ये जनता दरबार पार पडला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं. लोक आत्महत्या करण्यापर्यंत पावलं उचलत असून हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही असं सांगत त्यांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्याची मागणी केली आहे. “आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपालांना लवकरात लवकर मंत्रीमंडळ अस्तित्वात आलं पाहिजे असं सांगितलं आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांना तातडीने मदत करण्याची गरज आहे. ताबडतोब अधिवेशन बोलवलं पाहिजे. नेहमी जुलै महिन्यात अधिवेशन होत असतं, पण आता ऑगस्ट महिना उजाडला आहे. एक महिना होऊन गेला तरी यांना मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. यांना मुहूर्त, हिरवा झेंडा मिळेना की त्यांच्यात एकवाक्यता होत नाही.

मंत्रीमंडळ विस्तार करण्यासाठी का घाबरत आहेत हे कळण्यास काही मार्ग नाही,” असं अजित पवार म्हणाले आहेत.“महाराष्ट्रातील १३ कोटी जनता आशेने पाहत आहे. मी नागरिकांची भेट घेतली असून, त्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत, जे संबंधित खात्यांच्या मंत्र्यांशी बोलण्याची गरज आहे. सचिवांशी बोललो तर ते मंत्र्यांची सही असल्याशिवाय करु शकत नाही असं सांगत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे. ते घेत नाहीत म्हणून राज्यपालांना भेटलो होते. राज्यात कसा काऱभार चालला आहे आणि त्यासाठी कोण जबाबदार हे जनतेते पाहावं,” अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.“पूरग्रस्त भागातील लोकांचं मोठं नुकसान झालं आहे. लोक आत्महत्या करण्यापर्यंत पावलं उचलत असून हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. यामुळे त्यांना तातडीने मदत केली पाहिजे. मनुष्यहानी झाली असून पाळीव प्राण्यांचीही मोठी हानी झाली आहे. घरांची पडझड, रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. पूल पडले असल्याने लोकांचे स्पक्कही तुटले आहेत,” अशी माहिती अजित पवारांनी दिली.कोणतंही सरकार आलं तरी काम करत असताना कायदा, संविधान, नियम यांच्या आधीन राहून काम केलं पाहिजे असं आवाहनही त्यांनी केलं.