वृद्ध महिलेला लुटणाऱ्या चोरट्याना नागरिकांनी दिला बेदम चोप

दि. २९/१२/२०२२
शिरूर


शिरूर : घरात एकट्या असलेल्या वृद्ध महिलेला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघा चोरट्याना नागरिकांनी पकडून बेदम चोप दिला. ही घटना शिरूर जवळील रामलिंग येथे घडली.

कर्डेलवाडी, धनगरवाडा येथे भिवा कोळपे यांच्या आई सुरवंताबाई या एकट्याच घरी असल्याचे पाहून, चोरट्यांनी त्यांना विश्वासात घेत त्यांचे काही दागिने फुकट पॉलिश करून दिले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून आणखी दागिने घेऊन, हे चोरटे रामलिंगच्या दिशेने मोटारसायकलवर पळून जाऊ लागले. परंतु आजींनी आरडाओरडा केल्याने, वस्तीवरील तरुण तेथे आले व त्यांनी लगेच मोबाईल वरून पुढे माहिती दिली. त्यामुळे रामलिंग येथे अतुल धरणे यांनी तिथे येणाऱ्या चोरट्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. तरीही ते चोरटे थांबत नसल्याने त्यांनी हातातील ऊस त्या चोरट्यांना फेकून मारल्याने ते रस्त्यावर पडले. अशातही ते पळून जात असल्याने, तेथील लोकांनी व मागून पाठलाग करणाऱ्यांनी त्या चोरट्यांना पकडून चोप दिला.

ही घटना कळताच शिरूरचे पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, कॉन्स्टेबल प्रवीण पिठले, विनोद काळे, नितेश थोरात, उमेश जायपत्रे व चालक गणेश देशमाने, तसेच रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे, सहाय्यक फौजदार दत्ता शिंदे, कॉन्स्टेबल विजय शिंदे यांची दोन्ही पथके तातडीने दाखल झाली. त्यांनी चोरट्याना ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *