अधिवेशन सोडून अजित पवारांचा मुंबईला जाण्याचा निर्णय

२८ डिसेंबर २०२२

नागपूर


नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाकडून राज्यातील वेगवेगळ्या समस्यांवर सभागृहात प्रश्न उपस्थित केला जात आहेत. तर विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नाला सत्ताधारीही तेवढ्याच क्षमतेने उत्तर देत आहेत. विरोधकांकडून अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान अधिवेशन सुरू असतानाच विरोधी पक्षनेते अजित पवार नागपूरहून मुंबईला जाणार आहेत याविषयी अजित पवार यांनी माहिती दिली आहे.

अजित पवार म्हणाले, मला मिळालेल्या माहितीनुसार आमदार अनिल देशमुख यांना जामीन मिळालेला आहे. आज ते तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे. त्यांना मुंबईबाहेर जाता येणार नाही, असा आदेश न्यायालयाने दिलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वतीने जयंत पाटील यांनी सांगलीतून मुंबईत यावे, अशी विनंती करण्यात आली आहे. माझाही मुंबईत जाण्याचा प्रयत्न आहे,असे अजित पवार यांनी सांगितले.

माझे आज मुंबईला जाण्याचे नियोजन असतानाच उद्या आपण कामकाज सल्लागार समितीची आपण बैठक घेत आहोत, असे मला काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ही बैठक २८ डिसेंबर रोजी घेण्याऐवजी २९ डिसेंबर रोजी घ्यावी, अशी मी त्यांना म्हणालो. मला आज मुंबईकडे निघायचे असल्यामुळे मी तशी विनंती केली होती. त्यामुळे २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ ऐवजी १० वाजताच आपण ही बैठक घेऊ, त्यानंतर तुमचे मुंबईतील काम करून परत या असे मला शिंदे यांनी सुचवले. याच कारणामुळे राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील आणि मी माझ्या नियोजनात बदल केला. मी आता दुपारी २ वाजता मुंबईला जाणार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *