महापालिकेतर्फे सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण

दि. २७/१२/२०२२
पिंपरी


पिंपरी : स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये पिंपरी चिंचवड शहर देशात अव्वल स्थानावर येण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने महापालिकेच्या संबंधित अधिकारी, कर्मचारी व विभाग यांच्या कामकाजाचे स्वरुप व जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. याबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी दोन टप्प्यांत ४ ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहामध्ये इ आणि फ क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सफाई कर्मचा-यांचे प्रशिक्षण आज आयोजित करण्यात आले होते.

यावेळी आरोग्य विभागाचे उपआयुक्त अजय चारठाणकर, क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे, राजेश आगळे, स्वच्छ भारत अभियानाचे समन्वयक विनोद जळक, सहायक आरोग्याधिकारी शांताराम माने, मुख्य आरोग्य निरीक्षक एस.एस. गायकवाड, एस.बी. चन्नाल, आरोग्य निरीक्षक उध्दव डवरी, शैलेंद्र तवर,अमित पिसे, कॅम फाउंडेशनचे शाम राठोड, प्रसन्न येवलकर, बेसिक्स या माध्यम संस्थेचे प्रतिनिधी तसेच सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

योग तज्ञ अशोक देशमुख यांनी तणावमुक्त जीवन कसे जगावे, शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य कसे जपावे याविषयी उपस्थित सफाई कर्मचाऱ्यांना हास्य विनोदातून मार्गदर्शन केले. मानसिक आरोग्य जपण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वेगेवगळ्या टिप्स त्यांनी यावेळी दिल्या.

दरम्यान, इ आणि फ क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिनस्त असलेल्या नोव्हेंबर २०२२ मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणा-या सफाई कर्मचाऱ्यांना उपआयुक्त अजय चारठाणकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. भोसरी येथील सिद्धेश्वर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागतगीताद्वारे स्वागत केले. तसेच झिरो वेस्टवर आधारित कविता देखील त्यांनी सादर केली. संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘मै रस्ता हू’ ही स्वच्छतेवर आधारित गीत सादर केले. एस.पी.जी. इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी ‘रिड्यूस, रियूज, रिसायकल’ यावर आधारित गीत सादर केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे यांनी केले. तर सूत्रसंचालन पौर्णिमा भोर यांनी केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *