अभिनेता सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या; कूपर रुग्णालयातील कर्मचाऱ्याने केला दावा

२६ डिसेंबर २०२२


अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण अडीच वर्षांनी पुन्हा एकदा चर्चेत आलंय. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला ‘AU’ नावाने ४४ कॉल आल्याचं लोकसभेत सांगितलं. ‘AU’ म्हणजे आदित्य ठाकरे, असा दावा राहुल शेवाळेंनी केल्याने एकच खळबळ उडाली होती. अशातच सुशांतच्या शवविच्छेदनावेळी हजर असलेल्या एका व्यक्तीने धक्कादायक दावा केला आहे. सुशांतने आत्महत्या केली नव्हती, तर त्याचा खून करण्यात आला होता, असं या व्यक्तीने म्हटलंय.

कूपर हॉस्पिटलमध्ये सुशांत सिंग राजपूतचे पोस्टमॉर्टम करणारे रूपकुमार शाह यांनी हा दावा केला आहे. ते म्हणाले, “सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला तेव्हा आमच्याकडे ५ ते ६ मृतदेह शवविच्छेदनासाठी आले होते. त्यामध्ये एक आत्महत्या केलेला व्हीआयपी मृतदेह आला होता. जेव्हा तो मृतहेद शवविच्छेदन करण्यासाठी टेबलवर घेतला तेव्हा, तो सुशांतसिंह राजपूतचा असल्याचं कळलं. सुशांतच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आणि गळ्यावर दोन व्रण होते, हातापायवर मार लागून तुटल्यासारख्या खुणा होत्या. त्याची व्हिडीओ शूटींग करायला हवी होती, असं आमचं म्हणणं होतं. पण अधिकाऱ्यांनी फक्त फोटो काढायला सांगितलं. आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगितलं की, ही हत्याच वाटत आहे. त्यापद्धतीने त्यावर काम करावं, पण वरिष्ठ म्हणाले तत्काळ शवविच्छेदन करुन मृतदेह द्यायचा आहे, असा दावा शाह यांनी केला आहे.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरात आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळला होता. मुंबई पोलीस, ईडी, सीबीआय आणि एनसीबी या सर्व तपास यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी केली होती. चौकशीअंती सुशांतची हत्या नाही, तर आत्महत्याच होती, असा निर्णय अधिकाऱ्यांनी दिला होता.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *