लेखकांनी साहित्यिकांनी एखाद्या प्रश्नावर भूमिका मांडली पाहिजे : लक्ष्मीकांत देशमुख

पिंपरी : समाजाला साहित्याची, प्रबोधनाची, मार्गदर्शनाची, दिशादर्शकाची गरज आहे. त्यामुळे साहित्यिकांनी, लेखकांनी लिहिले पाहिजे. ज्या लेखनात साहित्यात समाज हित सामावलेले असते तेच खरे साहित्य होय आणि आज त्याचीच खरी गरज आहे. लेखक हा संवेदनशील असला पाहिजे. समाजाच्या संवेदना भावभावना त्याच्या लेखणीतून व्यक्त झाल्या पाहिजेत. लेखकाने एखाद्या प्रश्नावर “भूमिका” घेतली पाहिजे, ही परंपरा श्री संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांपासून सुरू आहे, परंतु आज ही परंपरा पाळली जात नाही असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी मोशी येथे व्यक्त केले.

इंद्रायणी साहित्य परिषद आणि मोशी ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित केलेल्या पहिल्या इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी लक्ष्मीकांत देशमुख बोलत होते. मोशी येथील यशवंतराव चव्हाण साहित्य नगरी, रवींद्रनाथ टागोर विचारपीठावर यावेळी संमेलनाचे अध्यक्ष कामगार नेते व माजी नगरसेवक अरुण बोऱ्हाडे, स्वागत अध्यक्ष संतोष बारणे, विश्वकर्मा पब्लिकेशनचे विशाल सोनी, हभप बाळासाहेब महाराज काशीद, कार्यकारीनी मंडळाचे अध्यक्ष संदीप तापकीर, देहु देवस्थानचे मोरे महाराज आदी उपस्थित होते.

यावेळी अध्यक्षीय भाषणात अरुण बोऱ्हाडे यांनी सांगितले की, सध्या मात्र शेतकरी, कष्टकरी, कामगार, कंत्राटी कामगार यांना पायाखाली चिरडून देश चालवण्याचा प्रयत्न केला जात आहे. देश गुलामगिरीरीकडे चालला आहे काय ? असा प्रश्न आता पडत आहे. वाढती महागाई, वाढता भ्रष्टाचार याविषयी कोणाला भय नाही. शिक्षणामध्ये पटसंख्या कमी झाली तरी शाळा बंद केली जाते. दऱ्या, खोऱ्यातील, डोंगर कपारातील शेतकऱ्यांच्या मुलांनी शिकायचे नाही काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. “आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा” या नावाखाली पालक कर्ज काढून मुलांना प्राथमिक शाळेत पाठवत आहेत. शिक्षण कुठे चालले आहे. देशावर ,राष्ट्रावर प्रेम आता कमी होत आहे . प्रगती झाली पाहिजे पण सत्याचा मार्ग पाहिजे. अधिकारी देखील लोकप्रतिनिधींना घाबरत नाहीत. कामगार शेतकरी देशदडीला लागला आहे ग्रामीण गरीब श्रीमंतातील दरी वाढत आहे. आता ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारी लेखक आणि साहित्यिकांवरच आली आहे पुढील पिढी जर सक्षम आणि सुसंस्कृत घडवायची असेल तर आता शिक्षक लेखक साहित्यिकांनी पुढे आले पाहिजे असे आवाहन संमेलनाध्यक्ष अरुण बोऱ्हाडे यांनी केले.

उद्घाटनापूर्वी श्री नागेश्वर महाराज मंदिर पासून संमेलन स्थळापर्यंत ग्रंथ दिंडी करण्यात आली या पालखीमध्ये ज्ञानेश्वरी बरोबरच संत तुकाराम महाराजांची गाथा, छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा ग्रंथ, गाथा महात्मा फुले समग्र वाङ्मय, ग्रामगीता, संविधान ठेवण्यात आले होते.

स्वागताध्यक्ष संतोष बारणे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन प्रा. दिगंबर ढोकले यांनी केले. आभार कार्यकारणी मंडळाचे कार्यध्यक्ष सोपान खुडे यांनी मानले. या संमेलनाच्या आयोजनामध्ये मोशी ग्रामस्थांसह इंद्रायणी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सीमा काळभोर, विकास कंद, सचिव रामभाऊ सासवडे, सहसचिव डॉ. ए. ए. मुलाणी , कोषाध्यक्ष अलंकार हिंगे, सदस्य दादाभाऊ गावडे, श्रीहरी तापकीर, सुनील जाधव यांनी सहभाग घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *