मराठी भाषिकांवर अन्याय होऊनही शिंदे फडणवीस सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे – जयंत पाटील
२३ डिसेंबर २०२२
कर्नाटकात अधिवेशनात सीमाप्रश्न विरोधी ठराव संमत करण्यात आला आहे. यावरुन महाराष्ट्रात वातावरण तापले आहे. काळ्या पट्टया बांधून आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर निषेध केला आहे. यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतरही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री साप चावल्याप्रमाणे गप्प बसले आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

दिल्लीने डोळे वटारल्यामुळे यांच्या तोंडातून शब्दही बाहेर निघत नाहीये – जयंत पाटील
जयंत पाटील म्हणाले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ‘बेळगावसह सर्व सीमांचे रक्षण करून महाराष्ट्र राज्याने तयार केलेल्या बेळगाव वादाचा निषेध करण्याचा ठराव’करूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री साप चावल्याप्रमाणे गप्प बसले आहेत, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आता तरी नेभळटपणा सोडून आपल्या विधानसभेत कर्नाटकच्या सरकार आणि मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधाचा ठराव मांडावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मराठी भाषिकांवर अन्याय होऊनही महाराष्ट्राचे शिंदे-फडणवीस सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. दिल्लीने डोळे वटारल्यामुळे यांच्या तोंडातून शब्दही बाहेर निघत नाहीये, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.