महापुरुषांचा ठरवून अपमान हे देवेंद्र फडणवीस यांच्या अधिपत्याखाली चाललेलं सुनियोजित षडयंत्र – सुषमा अंधारे

१३ डिसेंबर २०२२


छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि महापुरुषांबद्दल सातत्याने होत असलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध कऱण्यासाठी आज पुणे बंदची हाक देण्यात आली होती. यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांसह अनेक संघटनांचा समावेश होता. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर टीका करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर यांच्यावर हल्ला चढवला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींजींना रावण म्हटल्यानंतर अत्यंत तत्परतेने देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. मात्र महापुरुषांचा सातत्याने अवमान होत असताना ते सोयीस्कर मौन बाळगून आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, प्रसाद लाड, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा यांच्या विधानांवर ते गप्प आहे. भाजपकडून आणि टीम देवेंद्र यांच्याकडून महापुरुषांचा अवमान करण्याचा सुनियोजित कट रचला जात असल्याचं त्यांनी नमूद केलं.

देवेंद्रजींना विसर पडला असेल तर मी सांगू इच्छिते की, ते राज्याचे गृहमंत्री आहेत एका पक्षाचे नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राच्या भावना समजून घ्या. किमान सभागृहात निंदाजनक ठराव घ्या. तसेच देवेंद्रजींनी लोकभावना समजून घ्यावी. मात्र ते भाजपच्या नेत्यांना पाठिशी घालत असतील तर देवेंद्रजी आपल्याला आणि भाजपला हे वाचाळवीर बुडवल्याशिवाय राहणार नाही, असाही इशाराही अंधारे यांनी दिला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *