वैष्णवी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या ५१ लाखांच्या सोन्याचा तपास करण्यात पोलिसांना यश

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
०५ एप्रिल २०२२

नारायणगाव


आता पाहूयात गुन्हेगारी विश्वातील एक महत्वपूर्ण बातमी… जुन्नर तालुक्यातील आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीतील बेल्हे गावातील वैष्णवी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित, बेल्हे या सोसायटी मधून क्रेडिट सोसायटीच्या सभासदांनी तारण ठेवलेले एकूण ५१ लाख २१ हजार ३८२ रुपये किमतीचे ११४ तोळे ५१८ मिलीग्राम वजनाचे चोरीला गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आळेफाटा पोलिसांना यश आले आहे .

१ एप्रिल २०२२ रोजी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद दत्तात्रय महाडिक (रा. बेल्हे) यांनी याबाबत फिर्याद दिली होती. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी विविध तपास पथकांद्वारे सुनियोजित तपास केला. संस्थेतील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता संस्थेतील एका कर्मचाऱ्यांने सीसीटीव्ही बाबत छेडछाड केली असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार पतसंस्थेचा वसुली अधिकारी विकास शांताराम खिल्लारी (रा. बेल्हे) याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा केल्याचे मान्य केले.

दोन आरोपी मुद्देमालासह अटकेत

या गुन्ह्यामध्ये त्याला साथ देणारा त्याचा मित्र सचिन अशोक सोनवणे (रा. बेल्हे) याच्याकडे चोरलेले ५१ तोळे ५१८ मिलिग्रॅम सोने ठेवले असल्याचे व सचिन अशोक सोनवणे याच्या नावावर नारायणगाव येथील खाजगी बँक “मणप्पुरम गोल्डलोन” येथे उर्वरित ६३ तोळे सोने तारण ठेवून त्यावर कर्ज घेतले असल्याचे त्यांनी कबूल केले.यामध्ये सचिन अशोक सोनवणे व विकास शांताराम खिल्लारी या दोघांना वरील गुन्ह्याच्या तपासात ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. आळेफाटा पोलिसांनी तातडीने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन यातील आरोपींना तात्काळ अटक केली व त्यांच्या कडून ७२ तासाच्या आत गुन्ह्यातील चोरीला गेलेले सर्वच्या सर्व सोने अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. यातील चोरीला गेलेले सर्वच्या सर्व सोन्याचे दागिने हे जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

या तपासाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी नारायणगाव पोलीस स्टेशनच्या आवारात अप्पर पोलीस अधीक्षक मितेश, गट्टे यांनी पत्रकार परिषद घेऊन या गुन्ह्याची माहिती दिली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, हवालदार चंद्रा डुंबरे, विनोद गायकवाड, भीमा लोंढे, पोलीस नाईक संजय शिंगाडे, अमित माळुंजे, मोहन आनंदगावकर यांनी करून आरोपींना शिताफीने अटक केली. आज झालेल्या पत्रकार परिषदेसाठी उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक शेळके, नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *