भाजपाने गुजरातमध्ये विकासाचे सर्व विक्रम मोडीत काढले; गुजरात निकालावर अमित शाहांची प्रतिक्रिया

०८ डिसेंबर २०२२


गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने आतापर्यंतचे सारे विक्रम मोडीत काढत विजयाची सप्तपदी पूर्ण केली. १८२ जागांपैकी १५६ जागा जिंकल्या आहे. मागील वेळी ७८ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यावेळी मात्र दारुण पराभव पत्करावा लागला. त्यांना अवघ्या १७ जागाच मिळविता आल्या; तर आम आदमी पार्टीला केवळ ५ जागा मिळविता आल्याने त्यांचा दिल्ली पॅटर्न निष्प्रभ ठरला आहे. दरम्यान गुजरातमधील भाजपाच्या या विजयानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.

गुजरातच्या जनतेने भाजपाला आशीर्वाद देत विजयाचे सर्व विक्रम मोडीत काढले – अमित शाह

गुजरातने नेहमीच इतिहास घडवण्याचे काम केले आहे. गेल्या दोन दशकात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने गुजरातमध्ये विकासाचे सर्व विक्रम मोडीत काढले आणि आज गुजरातच्या जनतेने भाजपाला आशीर्वाद देत विजयाचे सर्व विक्रम मोडीत काढले, असं ट्वीट अमित शाह यांनी केलं आहे.

पोकळ आश्‍वासने, रेवडी वाटप आणि तुष्टीकरणाचे राजकारण करणाऱ्यांना गुजरातच्या जनतेने नाकारले आहे. तसेच विकासाचे राजकारण करणाऱ्यांना पंतप्रधान मोदींच्या भाजपाला अभूतपूर्व जनादेश दिला आहे. या विजयानंतर महिला, तरुण, शेतकरी पुन्हा एकदा भाजपाच्या पाठिशी आहेत, हे पुन्हा सिद्ध झाले आहे, असेही ते म्हणाले.

या ऐतिहासिक विजयाबद्दल मी गुजरातच्या जनतेला आभार मानतो. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील, आणि गुजरातमधील भाजपा कार्यकर्त्यांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *