ग्रामोन्नती मंडळाच्या नारायणगाव वरिष्ठ महाविद्यालयात एड्स जाणीव जागृती उपक्रमाचे आयोजन

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
०५ डिसेंबर २०२२

नारायणगाव


जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने ग्रामोन्नती मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव येथे एड्स जाणीव जागृती अभियानाचे विविध उपक्रमांच्या माध्यमातून आयोजन करून स्वयंसेवक व समाज जाणीव जागृती करण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत शेवाळे यांनी दिली.

राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रोटरी क्लब नारायणगाव हायवेचा उपक्रम

महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या पुढाकाराने आणि रोटरी क्लब नारायणगाव हायवे व आयसीटीसी विभाग, ग्रामीण रुग्णालय नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स जागृती अभियान राबविण्यात आले. तरुणांमध्ये एड्स विषयक जागृती करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय नारायणगावचे समुपदेशक संदेश थोरात यांनी एड्स एक जागतिक महामारी या विषयावर तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ दत्तात्रय रोकडे यांनी एड्स कारणे आणि उपाय आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.स्वप्निल कांबळे यांनी एड्स समज- गैरसमज या विषयावर मार्गदर्शन केले. जाणीव जागृती अभियान राबवताना स्वयंसेवकांनी घोषवाक्य, गटचर्चा, प्रश्न उत्तरे व मुक्त संवाद या माध्यमातून संवाद घडवून आणला.

रोटरी क्लब नारायणगाव हायवे आणि ग्रामीण रुग्णालय नारायणगाव यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांच्या माध्यमातून एड्स जाणीव जागृती रॅलीचे वारूळवाडी व नारायणगाव परिसरातून आयोजन करण्यात आले. त्यासाठी नारायणगाव महाविद्यालय,वारूळवाडी, एसटी स्टँड, पूर्व वेस, शिवाजी चौक, हनुमान मंदिर व ग्रामीण रुग्णालय नारायणगाव या ठिकाणी रॅली काढून घोषवाक्य व प्रबोधन करून जन जागृती केल्याची माहिती रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे अध्यक्ष रो.डॉ. श्रीकांत फुलसुंदर यांनी दिली. या अभियानाचा समारोप ग्रामीण रुग्णालय नारायणगाव येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ.शर्मिला गायकवाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने करण्यात आला. आजही समाजात एड्स या आजाराविषयी जागृती करण्याची गरज मोठ्या प्रमाणावर आहे, त्यासाठी तरुणांनी पुढाकार घेऊन प्रबोधनाच्या माध्यमातून जागृती करावी असे आवाहान केले. तसेच नारायणगाव महाविद्यालयातील स्वयंसेवकांनी रोटरी क्लब नारायणगाव हायवे व ग्रामीण रुग्णालयाच्या आयसीसीटी विभागाच्या माध्यमातून राबविलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे त्यासाठी भविष्यातही असे सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी ग्रामीण रुग्णालय सहकार्य करेल असे आश्वासन डॉ. शर्मिला गायकवाड यांनी दिले.

एड्स जाणीव जागृती उपक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत शेवाळे, वैद्यकीय अधीक्षक शर्मिला गायकवाड, रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे अध्यक्ष रो.डॉ. श्रीकांत फुलसुंदर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.स्वप्निल कांबळे यांनी विशेष प्रयत्न केले.
या उपक्रमामध्ये रोटरी क्लब नारायणगाव हायवे सेक्रेटरी नंदकुमार चिंचकर, खजिनदार नारायण आरोटे, रामभाऊ सातपुते, अर्थसंपदा पतसंस्थेचे संस्थापक रमेशशेठ मेहत्रे ग्रामीण रुग्णालय नारायणगाव मधील डॉ.अशोक माटे,डॉ. मिलिंद घोरपडे, डॉ.अभिजीत काळे,डॉ.प्रशांत पाटील,गणेश औटी स्वयंसेवक प्रतिनिधी म्हणून अभिशेक भोर व वैष्णवी कोल्हे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व स्वयंसेवक उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *