शिरूर शहरातील मुख्य रस्त्याचे रुंदीकरण सुरू असल्याने, सर्व वाहनांनी निर्माण प्लाझा रस्त्याचा वापर करावा – पो. नि. प्रवीण खानापुरे…

बातमी : रविंद्र खुडे
विभागीय संपादक
शिरूर : दि. ८ जुलै २०२१

शिरूर शहरातून जाणाऱ्या पुणे – नगर या जुन्या मार्गाचे, सध्या डांबरीकरणाचे काम सुरू असल्याने एस टी बस, अवजड वाहने, कंपनीच्या बस व इतर खाजगी वाहनांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर, शीरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी, गुरुवार दि. ८ जुलै २०२१ रोजी शिरूरच्या मध्यवर्ती शासकीय इमारतीच्या सभागृहात, शिरूरच्या नागरीकांसमवेत चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. त्यास शिरुरचे नगरसेवक, व्यापारी, नागरिक, प्रशासकीय अधिकारी व पत्रकार उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी, शिरूरमध्ये मागील काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातांमध्ये, दोन जणांना आपला जीव गमवावा लागल्याची आठवण करून देत, वाहतूक समस्येबाबत आपले विचार मांडले. तसेच सध्या शिरूर शहरातील रस्त्याचे काम सुरू असल्याने, व्यापारी बांधवांनी सहकार्य करत आपला येणारा माल हा रात्री नऊ वाजल्यानंतर बोलावून खाली करावा असेही आवाहन केले.

त्यावर, व्यापारी संघवी यांनी स्पष्ट केले की, हमाल लोक रात्री थांबत नाहीत, त्यामुळे आमचा माल रात्री उतरविण्यात अडचण येईल.
व्यापारी बोरा यांनीही गावातील वाहतूक कोंडीबाबत समस्या मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार छोट्या बोळांमध्ये बसणाऱ्या भाजीविक्रेत्यांमुळे रस्त्यात कोंडी होत असून अनेक वेळा वाद विवादही होतात.
त्यावर नगरपालिकेच्या प्रतिनिधींनी सांगितले की, अशा रस्त्यात बसणाऱ्या भाजीवाल्यांवर आम्ही कारवाया करत आहोत व त्यांना दंड पावती देत आहोत.
पत्रकार अर्जुन बढे यांनी सांगीतले की, बऱ्याचशा व्यापाऱ्यांनी स्वतःची अशी पार्किंग व्यवस्था केली नसल्यानेही वाहतूक कोंडी होत आहे.
त्यावर नगरसेवक मंगेश खांडरे यांनीही दुजोरा देत स्पष्ट केले की, बऱ्याच व्यापाऱ्यांचा माल हा दुकानाबाहेर व रस्त्यावरच मांडलेला असतो, त्यामुळे शहरातील गल्ली बोळांमध्ये रस्ताकोंडी होत आहे.
नगरसेवक मुजफ्फर कुरेशी यांनी सूचना केली की, शिरूरमध्ये येणाऱ्या विविध कंपन्यांच्या बसेस या जर पाबळ फाट्याजवळील नगरपालिकेच्या नवीन इमारतीसमोर उभ्या केल्या व तेथेच त्यांचे कामगार येऊन थांबले, तर वाहतूक कोंडी काही प्रमाणात टळू शकते.

Advertise


पत्रकार मुकुंद ढोबळे यांनीही यावेळी सांगितले की, जर एस टी बस व इतर वाहतूक ग्रामीण रुग्णालय मार्गाने वळविली, तर तेथे असणारा सरकारी दवाखाना, व्यवसाय, दुकाने, रहिवासी यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, शिवाय तेथे वाहतूक कोंडीही होऊ शकते. त्याऐवजी एस टी बस थांबाच तात्पुरत्या स्वरूपात पाबळ फाट्याजवळील मैदानात न्यावा व तेथूनच सर्व बस पुन्हा मागे फिरवून हाय वे कडे पाठवाव्यात.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक विनोद भालेराव यांनीही आपले मत मांडताना सांगितले की, दोन निष्पाप जीवांचा याआधी हकनाक बळी गेलाय. खरे तर पोलीस प्रशासनाने त्या वाहतूक कोंडीच्या आधीच कठोर भूमिका घेतली असती, तर ती वेळ आलीच नसती. परंतु आतातरी कठोर भूमिका घ्यावी, त्यासाठी आम्ही सर्व नागरिक पोलीस व प्रशासनाच्या सोबत राहू.
पत्रकार सतीश धुमाळ, नितीन बारवकर, संतोष शिंदे, रविंद्र खुडे, अभिजित आंबेकर, शोभा परदेशी आदी पत्रकार मंडळींनीही, वाहतूक समस्येविषयी आपापली मते मांडली.
तसेच, मनसेचे मेहबूब सय्यद, रिक्षा संघटनेचे अनिल बांडे, ऍड. सुभाष पवार, ऍड रवींद्र खांडरे व उपस्थित सर्वच मान्यवरांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासंदर्भात चर्चेत सहभाग घेतला.
या सर्व चर्चेअंती, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी निर्णय घेतलाय की, सध्या शहरातील रस्ता रुंदीकरणाचे काम होईपर्यंत व सध्याची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, अवजड वाहने व इतरही वाहनांनी “रिलायन्स पंप हाय वे कडून – शिरूर मार्केट यार्ड – ग्रामीण रुग्णालय – निर्माण प्लाझा – बी जे कॉर्नर – जोशी वाडी मार्गे सतरा कमान पूल हाय वे” या मार्गाचा येण्यासाठी व जाण्यासाठी वापर करावा.

फक्त एस टी बस व काही अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता, सर्व वाहनांना हा रस्ता वापरणे बंधनकारक असल्याचे पोलीस निरीक्षक खानापुरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *