महाराष्ट्राचा कारभार होणार पेपरलेस, सरकारी कार्यालयात १ एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली

०२ डिसेंबर २०२२


प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि कागदविरहित (पेपरलेस) होण्यासाठी येत्या १ एप्रिलपासून राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरू करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

केंद्रीय प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे सचिव श्री. व्ही. श्रीनिवास यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. राज्यात सुप्रशासनविषयक मार्गदर्शिका (गुड गव्हर्नन्स मॅन्युअल) तयार करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याच्या सूचना देतानाच देशात सुप्रशासन निर्देशांकात द्वितीय क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिल्या.

राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणालीचा वापर सुरू केल्यास कामकाजाला गती येईल, शिवाय कामकाज संपूर्णपणे कागदविरहित (पेपरलेस) होणार असल्याने अधिक सुलभता येणार आहे. त्यामुळे येत्या १ एप्रिलपासून राज्याच्या सर्व कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरू करण्याची घोषणा शिंदे यांनी केली. सर्व कार्यालये ‘ई-ऑफिस’ वापरू लागले की मोबाइलवरदेखील कामकाजाच्या फाइल्स, कागदपत्रे पाहता येतील, त्याला मान्यता देता येणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *