ट्विटरच्या ५४ लाख युजर्सचा डेटा लीक

२९ नोव्हेंबर २०२२


अलीकडेच ५० कोटी व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आल्यानंतर आता ५४ लाख ट्विटर युजर्सचा डेटा देखील लीक झाल्याचे समोर आले आहे. लीक झालेल्या डेटामध्ये सार्वजनिक माहिती, खाजगी फोन नंबर आणि ईमेल आयडीचा समावेश आहे.

कोड प्रभावित झाल्याने डेटा उघड झाल्याची कबुली ट्विटरने या वर्षी जुलै महिन्यात दिली होती. मात्र नंतर डेटाचा गैरवापर करण्यात आला की नाही, याबाबत माहिती नसल्याचे ट्विटरकडून सांगण्यात आले होते. परंतु, आता ब्लिपिंग कंम्प्युटरच्या अहवालानुसार, ५४ लाख ट्विटर युजर्सचा डेटा हॅकर फॉरमवर मोफत शेअर करण्यात आला आहे.अहवालानुसार, डेटामध्ये युजरची सार्वजनिक माहिती, खाजगी फोन क्रमांक, ईमेल आयडीचा समावेश आहे. सप्टेंबर महिन्यात आणि २४ नोव्हेंबरला ५४ लाख ट्विटर युजर्सचा डेटा हॅकिंग फॉरमवर शेअर करण्यात आल्याचे, अहवालात म्हटले आहे.

लिक झालेला हाच डेटा ऑगस्ट मध्येही विक्री झाला होता आणि त्यात ५४ लाख ८५ हजार ६३५ ट्विटर युजर्सची माहिती होती, हे खरे असल्याचे ब्रिच हॅकिंग फोरमचे मालक पॉमपॉमप्युरिन यांनी ब्लिपिंग कंम्प्युटरला सांगितले आहे. माहितीमध्ये फोन क्रमांक किंवा खाजगी ईमेल अ‍ॅड्रेस, ट्विटर आयडी, नाव, स्क्रिन नाव, व्हेरिफाइड स्टॅटस, पत्ता, यूआरएल, फॉलोवरची संख्या, खाते तयार केल्याची तारीख, मित्र संख्या, प्रोफाइल इमेज यूआरएलचा समावेश असल्याचे सांगितले. चाड लोडर या सुरक्षा तज्ज्ञाने ट्विटर पोस्टमध्ये, डेटा लीक होण्याबाबत इशारा दिला होता. मात्र, त्यांचे खाते आता निलंबित करण्यात आले आहे. मला युरोप आणि अमेरिका येथील लाखो ट्विटर युजर्सना प्रभावित करेल अशा मोठ्या ट्विटर डेटा लिकबाबत पुरावे मिळाले आहेत, असे लोडर यांनी ट्विट केले होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *