शिरुरसह पुणे व अहमदनगर जिल्ह्यामध्ये चोरी करणाऱ्या अट्टल मोटार सायकल चोरांना, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केली अटक…

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर : दि. 14/06/2021.

पुणे जिल्ह्यातील शिरूर, नारायणगाव, जुन्नर व अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीरामपूर या भागात मोटरसायकली चोरलेल्या होत्या. त्यांच्याकडून चोरीचे आठ गुन्हे उघडकीस आणून, ११ मोटारसायकल असा सुमारे चार लाख १० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे.

यात सिद्धार्थ रमेश बर्डे (वय वर्षे २१, रा. खोडद, ता. जुन्नर, जि. पुणे) व एक अल्पवयीन मुलगा, अशा दोघा जणांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेली माहिती अशी की –
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात तसेच नगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्या अनुषंगाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मोटारसायकल गुन्ह्यांचा तपास करून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिलेल्या होत्या. त्यानुसार सदर गुन्ह्याचा तपास करत असताना, गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे ग्रामीण जिल्ह्यातील नारायणगाव, जुन्नर, आळेफाटा तसेच नगर जिल्ह्यातील अनेक भागात फिरून सदर गुन्ह्याबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली. रविवार दिनांक १३ जून २०२१ रोजी गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील खोडद या गावात काही इसम काही एक कामधंदा न करता वारंवार विविध प्रकारच्या मोटारसायकल वापरत आहेत. सदर ठिकाणी गेल्यानंतर त्यांना पोलीसांची चाहूल लागताच पळून जाऊ लागले असता पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी त्यांची नावे सिद्धार्थ रमेश बर्डे, वय वर्षे २१, रा. खोडद, ता. जुन्नर, जि. पुणे आणि एक विधिसंघर्षग्रस्त बालक, असे मिळून आले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतु त्यांची अजून सखोल चौकशी केली असता, त्यांनी त्यांच्या ताब्यातील विविध कंपनीच्या ११ मोटारसायकल ह्या चोरी करून आणल्या असल्याचे सांगितले.

Advertise

चौकशी दरम्यान त्यांनी पुणे आणि नगर भागात चोरी केलेल्या इतर मोटारसायकलिंची माहिती दिली.

सदर आरोपींकडून ४,१०,०००/- रकमेच्या एकूण ११ मोटारसायकल जप्त केल्या असून, त्यांच्याकडून एकूण ८ गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींची वैदकीय तपासणी करून पुढील कारवाई साठी नारायणगाव पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उप विभागिय पोलिस अधिकारी मंदार जावळे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, यांचे आदेशाने व सुचनेनुसार सपोनि नेताजी गंधारे, पोहवा विक्रम तापकीर, पोहवा सचिन गायकवाड, पोना दिपक साबळे, पोशी संदीप वारे, पोशी अक्षय नवले, पोशी निलेश सुपेकर, पोहवा मुकुंद कदम या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *