रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी, दि. १४ मे २०२१ :- राज्यातील कोरोना आपत्ती निवारणाच्या उपाययोजनांकरिता मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणगी म्हणून महापालिका अधिकारी आणि कर्मचारी आर्थिक मदत करणार आहेत. याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी सर्व विभागांना परिपत्रकाद्वारे सूचित केले आहे.
कोरोना आपत्तीच्या दुस-या टप्प्यात महाराष्ट्र राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे गंभीर परिस्थिती उद्भवलेली आहे. राज्य शासनाचे सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, महसूल विभाग, गृह विभाग तसेच अन्य संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी कोरोना आपत्तीच्या निवारण्यासाठी प्रभावी उपाययोजना करित आहेत. यासाठी सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरु आहे.
या आपत्तीस सामोरे जाण्यासाठी सहाय्य व मदत व पुनर्वसनाच्या कामास आपलाही हातभार लागावा म्हणून मानवतावादी दृष्टीकोनातून राज्याला देणगी म्हणून आर्थिक मदत करणे आवश्यक असल्याने सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, पंचायत समिती महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे, मंडळे तसेच सर्व स्वायत्त संस्थेच्या सेवेत कार्यरत असलेल्या गट-अ तर गट-ब मधील राजपत्रित अधिकारी त्यांच्या माहे मे, २०२१ च्या वेतनातील प्रत्येकी दोन दिवसाचे तर गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड मधील कर्मचारी यांचे प्रत्येकी एक दिवसाचे वेतन त्यांच्या वेतनातून कपात करण्याकामी तसेच राजपत्रित, सेवानिवृत्त अधिका-यांच्या सेवानिवृत्ती वेतनातून देखील दोन दिवसांचे निवृत्तीवेतन कपात करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने परिपत्रकान्वये कळविले आहे.
शासनाच्या परिपत्रकानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील गट-अ आणि गट-ब चे राजपत्रित अधिकारी यांच्या माहे मे, २०२१ च्या वेतनातील प्रत्येकी दोन दिवसांचे तर गट-ब (अराजपत्रित), गट-क आणि गट-ड मधील कर्मचा-यांचे प्रत्येकी एक दिवसाचे वेतन तसेच राजपत्रित अधिका-यांच्या सेवानिवृत्ती वेतनातून दोन दिवसांचे निवृत्तीवेतन कपात करण्यात येणार आहे.