चिन्ह गोठवण्याच्या प्रक्रियेला ठाकरे गटाचा विरोध, दिल्ली हायकोर्टात याचिका

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१४ नोव्हेंबर २०२२


अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील पक्षचिन्हाचा वाद उफाळून आला होता. अखेर निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला स्वतंत्र चिन्ह दिली होती. शिवाय धनुष्यबाण हे शिवसेनेनचं पक्षचिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचं नावही गोठवलं होतं. या विरोधात ठाकरे गटाने आवाज उठवला होता. पक्षाचं निवडणूक चिन्ह आणि नाव गोठवण्याच्या प्रक्रियेविरोधात ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात धाव घेतलेली. त्यावर आज महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

चिन्ह गोठवण्याच्या प्रक्रियेविरोधात आता दोन्ही बाजूंना लेखी स्वरुपात बाजू मांडण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याआधी सोमवारी ठाकरे गटाने आपला युक्तिवाद दिल्ली हायकोर्टात केला होता. यावेळी धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचं नाव या दोन्ही वापरण्यास पुन्हा परवानगी द्यावी, अशी अप्रत्यक्ष मागणी करण्यात आलीय. सोमवारी पार पडलेल्या युक्तिवाद ठाकरे गटाच्या वतीने कायदेशीर बाबींवर दिल्ली हायकोर्टाचं लक्ष वेधण्यात आलं. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा प्रलंबित आहे. त्यावरही कोर्टात सुनावणी सुरु आहे. अशा वेळी चिन्ह गोठवण्याचा निर्णय कसा होऊ शकतो, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

दरम्यान, पोटनिवडणूक लढण्यासाठी पक्षचिन्ह गोठवण्यात आलं होतं. मात्र शिंदे गटाने आपला उमेदवारच या निवडणुकीत दिला नाही. शिवाय आता पोटनिवडणूक संपली असून ताप्तुरता निर्णय आता पुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आलीय.ठाकरे गटाने केलेल्या मागणीवर दिल्ली हायकोर्ट आता काय निर्णय घेतं? ठाकरे गटाला पुन्हा धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्याची परवानगी मिळते का? शिवसेना हे पक्षाचं नाव वापरण्यास मिळणार का? यावर दिल्ली हायकोर्टात नेमकं काय घडतं, हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे. ८ ऑक्टोबर रोजी शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्यात आलं होतं. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला होता. त्यानंतर ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं होतं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *