विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१४ नोव्हेंबर २०२२


विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. माझ्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवताना आयपीसी ३५४ कलम लावले. हे माझ्या मनाला लागले असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. समाजामध्ये माझी बदनामी व्हावी, यासाठीच हा षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. यावेळी बोलताना आव्हाड भावूक झाले. इतक्या खालच्या पातळीवरील राजकारण महाराष्ट्रात होऊ नये. घरे उद्ध्वस्त होतील असेही आव्हाड यांनी म्हटले.

३०७, ३२३, ३२३ हे सगळे गुन्हे मला मान्य हे माझ्याहातून घडले आहेत आणि घडू शकतात. पण, ३५४ सारखा विनयभंगाचा गुन्हा अमान्य असून, जो मी आयुष्यात कधी केला नाही. पोलिसांनी हा गुन्हा कसा काय नोंद केला. त्या महिलेने एफआयआरमध्ये वापरलेले शब्द व्हिडीओत स्पष्ट ऐकू येत आहेत. समाजात माझी मान खाली जाईन, अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करायचा हा षडयंत्राचाच भाग असू शकतो, असा आरोपी आव्हाड यांनी केला.

समाजामध्ये मान खाली जाईल, असा आरोप माझ्यावर लावण्यात आले. राजकारण करावे पण इतक्या खालच्या पातळीवर करू नये. याआधीदेखील पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवण्यात आले आणि तिथे बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली असे आव्हाड यांनी सांगितले. माझ्याविरोधात ओढूनताणून गुन्हा नोंदवला जात आहे. काहीही कारण नसताना आम्हाला कोठडीत ठेवले. त्यामुळे आम्ही माफी मागणार नाही.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *