अब्दुल सत्तार जे बोलले, त्याचं कोणतंही समर्थ मी करणार नाही – देवेंद्र फडणवीस

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०८ नोव्हेंबर २०२२


राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी बोलताना राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली आणि त्याचे पडसाद राज्यभर उमटताना पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं ठिकठिकाणी सत्तारांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. अब्दुल सत्तारांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. त्यावर आता देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

कुणीही महिलांबद्दल अपशब्द काढू नयेत. ते अतिशय चुकीचं आहे. आम्ही त्याचा विरोधच करू. पण जसं आमच्याकडच्यांना ते लागू आहे, तसंच ते त्यांच्याकडच्यांनाही लागू आहे. पण मला आज त्याच्यात जायचं नाहीये, असं फडणवीस म्हणाले.मला वाटतं की राजकारणात आचारसंहिता पाळली गेली पाहिजे. अब्दुल सत्तार जे बोलले, त्याचं कोणतंही समर्थ मी करणार नाही. ते चूकच आहे. पण त्याचवेळी खोके आणि काय काय उलटसुलट बोलणं हेही चुकीचं आहे. हेही समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी आचारसंहिता पाळणं गरजेचं आहे. पातळी खाली चालली आहे. राजकारणाची ही पातळी महाराष्ट्रात असू नये”, असंही फडणवीस म्हणाले. जोपर्यंत मोठे नेते आपापल्या लोकांना हे सांगत नाहीत, तोपर्यंत हे शक्य होणार नाही. नाहीतर नेत्यांनी वेगळं बोलायचं आणि नंतर त्यांच्या लोकांनी बोलल्यावर त्याचं समर्थन करायचं असं करणं योग्य होणार नाही. त्यामुळे सगळीकडच्या नेत्यांनी आचारसंहिता पाळली पाहिजे अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *