शहरात दिवाळीमुळे रक्तदान शिबिरांमध्ये घट

०१ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


दिवाळीच्या कालावधीत रक्तदान शिबिरांचे प्रमाण घटल्याने शहरातील रक्तपेढ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून निगेटिव्ह रक्तगटाबरोबरच पॉझिटिव्ह रक्तगटाच्या रक्ताचादेखील तुटवडा जाणवत आहे . काही रक्तपेढ्यांमध्ये तर रक्ताच्या मोजक्याच पिशव्या उपलब्ध आहेत . त्यामुळे त्यांना रक्तदात्यांना बोलावून गरजेनुसार रक्ताची गरज भागवावी लागत आहे . थॅलेसेमिया , हिमोफेलिया आणि सिकलसेल अॅनिमिया आजार झालेल्या रुग्णांना सतत रक्ताची गरज लागत असते . त्यांना काही कालावधीनंतर रक्त बदलावे लागते . सध्या जाणवत असलेल्या रक्ताच्या तुटवड्यामुळे त्यांनाही विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे . त्यांची रक्ताची मागणी लक्षात घेता रक्तपेढ्यांना रक्तदात्यांना बोलावून त्यांना रक्त उपलब्ध करुन द्यावे लागत आहे.

सध्याची परिस्थिती लक्षात घेता विविध स्वयंसेवी संस्था , संघटना यांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे गरजेचे आहे . रक्तपेढ्यांतील सद्यःस्थिती शहरातील काही प्रमुख रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा आणि कोणत्या रक्तगटाच्या रक्ताचा तुटवडा आहे , याबाबत विचारणा केली असता सर्वच रक्तगटाच्यापिशव्यांचा तुटवडा जाणवत असल्याचे सांगण्यात आले . तुलनेत बी पॉझिटिव्ह रक्तगटाचा सर्वाधिक तुटवडा आहे . काही रक्तपेढ्यांमध्ये केवळ दोनच दिवस पुरेल इतका रक्तसाठा उपलब्ध आहे . तर , काही रक्तपेढ्यांमध्ये मात्र १५ दिवस पुरेल इतका रक्तसाठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

रक्ताची दररोजची गरज किती ? वायसीएम येथील रक्तकेंद्रामध्ये रक्त व रक्तघटक यांच्या एकूण ५० ते ६० रक्त पिशव्यांची दररोजची गरज असते . दिवाळी सणामुळे शस्त्रक्रियांचे प्रमाण कमी असल्याने ही मागणी घटून सध्या ३० ते ४० रक्त पिशव्यांवर आली होती . ही मागणी भागविण्यासाठी रक्तकेंद्रातर्फे रक्तदात्यांना बोलावून घेऊन त्यांच्याकडून रक्तदान करून घेण्यात येत आहे , अशी माहिती वायसीएम रक्तकेंद्राचे रक्तसंक्रमण अधिकारी शंकर मोसलगी यांनी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *