निवडणूक आयोगाकडून ‘ढाल-तलवार’ निशाणी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१२ ऑक्टोबर २०२२


अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ चिन्ह देण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह दिलं होतं. तर शिंदे गटाने दिलेली तिन्ही चिन्ह रद्द करत मंगळवारवारी नवीन चिन्ह पाठवण्यास सांगितले होते. त्यानुसार शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे ई मेलद्वारे चिन्ह पाठवले गेले होते. त्यापैकी आयोगाने शिंदे गटाला ‘ढाल-तलावर’ हे चिन्ह जाहीर केलं. आयोगाच्या या निर्णयानंतर सर्वत्र आता राज्यात मशाल विरुद्ध ढाल-तलवार अशीच लढाई दिसणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ‘ढाल-तलावर’ चिन्ह जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला जो निर्णय आहे तो आम्हाला मान्य आहे. आम्ही प्राधान्य तळपता सूर्य चिन्हाला दिलं होतं, परंतु त्यांनी आम्हाला ते चिन्ह दिलं नाही. आम्हाला ढाल-तलवार त्यांनी दिली आहे आणि त्यांचा निकाल आम्हाला मान्य आहे. ढाल-तलवार ही शिवसेनेची जुनीच निशाणी आहे. आपली बाळासाहेबांची शिवसेना आहे. ही मराठमोळी निशाणी आहे. त्यामुळे आता परफेक्ट काम झालेलं आहे. ढाल-तलवार ही छत्रपती शिवरायांची आणि त्यांच्या मावळ्यांची निशाणी आहे, त्यामुळे ती अगोदच सर्वत्र पोहचलेली आहे.

तसेच एकनाथ शिंदेंनी ट्वीटद्वारे देखील भावना व्यक्त केली आहे. “आम्हीच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्वाच्या विचारांचे खरे वारसदार, सज्जनांच्या रक्षणासाठी बनूनी ढाल, दुर्जनांच्या संहारासाठी हाती धरू तलवार. बाळासाहेबांची शिवसेना. निशाणी : ढाल-तलवार.” असं शिंदेंनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *