आदर्श युवक घडविण्याची कार्यशाळा म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजना – प्रा डॉ ईश्वर पवार

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
२९ सप्टेंबर २०२२

शिरूर


देश आणि समाजासाठी आदर्श युवक घडविण्याची कार्यशाळा म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजना होय’ असे प्रतिपादन शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख व प्रसिद्ध भाषा अभ्यासक डॉ. ईश्वर पवार यांनी केले. तळेगांव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात दि. २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना डॉ. पवार बोलत होते. शिक्षण प्रसारक मंडळ व विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. अशोक नवले, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सोमनाथ पाटील, डॉ. संदीप सांगळे, डॉ. पराग चौधरी व प्रा. मिनाक्षी पोकळे आदी मान्यवर याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. पवार पुढे म्हणाले की, “काळानुसार आपल्यापुढील आव्हाने देखील बदलत आहेत. त्यामुळे युवकांनी देखील सकारात्मक जीवनशैली आत्मसात करुन बदलले पाहिजे. क्रांतिकारक, समाजसुधारक हे आपल्या पुढील आदर्श असायला हवेत. त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजना सारखे व्यासपीठ हे खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरते. प्रथम राष्ट्र आणि समाजहित हेच आपले प्राधान्य असायला हवे. युवकांनी त्यासाठी स्वतःला सिद्ध करणे काळाची गरज असल्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महेशबापू ढमढेरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व याप्रसंगी विषद केले. पदवी बरोबरच विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्व विकास साधून यशस्वी नागरिक बनण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असून, राष्ट्रीय सेवा योजना हे त्यासाठी उत्तम व्यासपीठ असल्याचे महेशबापू ढमढेरे यांनी सांगीतले. शिक्षण प्रसारक मंडळ सातत्याने सामाजिक बांधिलकी जोपासत असून, विवीध घटकांतील विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी कार्यरत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. शिस्त आणि धर्मसंस्कृतीचे पालन युवकांनी करायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त महाविद्यालय परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या संपूर्ण कार्यक्रमात हिरीरीने सहभाग घेतला. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. संदीप सांगळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. दत्तात्रय कारंडे यांनी सुत्रसंचालन तर कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सोमनाथ पाटील यांनी आभार मानले. प्रा. डॉ. दत्तात्रय वाबळे, डॉ. पद्माकर गोरे, डॉ. मनोहर जमदाडे, डॉ. अमेय काळे, प्रा. अविनाश नवले, प्रा. किशोर आढाव, प्रा. जनार्दन गिरमकर , प्रा. केशव उबाळे आदींनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *