आदित्य ठाकरे यांना झेड दर्जाची सुरक्षा असूनही त्यांच्या सुरक्षेत तडजोड

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१६ सप्टेंबर २०२२


आदित्य ठाकरे सध्या शिवसंवाद यात्राकरिता रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचा हा मतदारसंघ असून सध्या वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पावरून या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर आदित्य ठाकरे दाखल झाल्यानंतर त्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत मोठा हलगर्जीपणा झाल्याची चर्चा सगळीकडेच सुरू झाली आहे. कारण आदित्य ठाकरेंच्या झेड दर्जाच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक तर हजर होते, मात्र त्यांना गाड्या पुरवण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे हे सुरक्षारक्षक देखील खासगी वाहनाने आदित्य ठाकरेंना सुरक्षा पुरवण्यासाठी दाखल झाल्याची बातमी समोर अली आहे.

रत्नागिरी दौऱ्यासाठी आदित्य ठाकरे आज चार्टर्डजेट विमानाने दाखल झाल्यानंतर त्यांना झेड सुरक्षा पुरवण्यात येणं अपेक्षित होतं. मात्र, त्यांच्या झेड सुरक्षेसाठीचे सुरक्षारक्षक खासगी वाहनाने दौऱ्यासाठी आल्याचं दिसून आलं. झेड सुरक्षेसाठी गृह विभागाकडून गाड्या पुरवल्या जातात. मात्र, आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्यासाठी मुंबईहून गाड्याच आल्या नाहीत. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक खासगी गाड्यांमधून आल्याचं दिसून आलं. यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारणा करताच आदित्य ठाकरेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

“हा प्रश्न पूर्णपणे सरकारचा आहे. ही त्यांची जबाबदारी असते. माझ्यासोबत आमचे शिवसैनिक आहेत. त्यांच्याच भरंवशावर आम्ही पुढे जात आहोत. महाराष्ट्र आम्हाला सांभाळून घेईल”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे. दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत हलगर्जीपणा दिसून आल्याचं म्हणत काही घडल्यास त्याची पूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल, अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *