प्रहारच्या दिव्यांग बांधवांचे शिरूर पं. स. व तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठीचे एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन संपन्न

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
०३ सप्टेंबर २०२२

शिरूर


प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री, आमदार बच्चू कडू, तसेच राज्याध्यक्ष बापू काणे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या मार्गदर्शनाखाली, शुक्रवार दि. 02/09/2022 रोजी शिरूर पंचायत समिती कार्यालय व शिरूर तहसील कार्यालय येथे दिव्यांग बांधवांचे एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांचे स्मरण शासनास करून दिले.

शिरूर पं. स. येथे झालेल्या आंदोलनात विविध मागण्या करण्यात आल्यात. त्यात प्रामुख्याने 5% दिव्यांग निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणे, दिव्यांग निर्वाह भत्ता, पं स मध्ये दिव्यांग स्वतंत्र कक्ष, दिव्यांग हक्क कायदा 2016 च्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे, दिव्यांग घरपट्टी मध्ये 50% सुट मिळणे, दिव्यांग लाभार्थ्यांची ग्रामपंचायत दप्तरी नोंद, ग्रा. पं. च्या व्यावसायिक गाळ्यांच्या कोट्यात दिव्यांगांनाही राखीव गाळे ठेवणे, इत्यादी प्रलंबित मागण्यांसाठी शिरूर पंचायत समिती कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात येऊन निवेदन देण्यात आलेय. यावेळी शिरूर पं. स. चे प्रभारी गटविकास अधिकारी अजित देसाई यांनी स्वतः दिव्यांग बांधवांच्या आंदोलन स्थळी भेट देत निवेदन स्वीकारले व त्वरित त्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी केली जाईल असेही अश्वासन दिले. त्याचप्रमाणे दिव्यांग बांधवांनी शिरूर तहसील कार्यालयावरही आंदोलन केले. त्यात त्यांनी स्वतंत्र मंत्रालयाच्या मागणीचे निवेदन दिलेय. यावेळी शिरूरचे प्रभारी तहसीलदार प्रशांत पिसाळ यांनी दिव्यांग बांधवांच्या आंदोलन स्थळी स्वतः जात या निवेदनाचा स्वीकार करत, शासनाकडे ते पाठविण्याचे आश्वासन दिले.

अजित देसाई, पं. स. चे प्रभारी गटविकास अधिकारी यांना निवेदन देताना प्रहारचे शिरूर तालुका पदाधिकारी

शिरूर महसूल विभागाशी संबंधित या निवेदनात अनेक मागण्या करण्यात आल्यात. त्यात प्रामुख्याने शिरूर तालुक्यातील दिव्यांगांसाठी अंत्योदय रेशन कार्ड, सेतू कार्यालयात प्रहार संघटनेचा एक प्रतिनिधी नेमणे, संजय गांधी योजनेचे पैसे 10 तारखेपर्यंत जमा करणे. तसेच दिले जाणारे 1000 रु. मानधन वाढवून वाढत्या महागाईनुसार 3000 रु. करणे, इ. मागण्यांचे स्मरणपत्र तहसीलदार यांना यावेळी देण्यात आले. त्यास उत्तर देताना तहसीलदार यांनी लवकरात लवकर पाठपुरावा करून या मागण्यांवर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिव्यांग बांधवांना दिले. त्याचप्रमाणे, शिरूरच्या तहसील कार्यालयाची लिफ्ट अनेक दिवस बंद होती, ती अनेकदा बंद पडते तसेच सध्याही बंदच आहे. त्यामुळे मुख्य प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयांमध्ये येणाऱ्या दिव्यांग बांधव, जेष्ठ नागरिक व कार्यालयातील दिव्यांग कर्मचारी, अधिकाऱ्यांना अक्षरशः अनेक पायऱ्यांवरून फरपटत जावे लागते. त्यामुळे येथे वयस्कर व दिव्यांग बांधवांची सततची होणारी ही फरपट थांबविण्याची मागणीही यावेळी करण्यात आलीय.

या एकदिवसीय लक्षवेधी आंदोलनावेळी पुणे जिल्हाध्यक्ष महेंद्र निंबाळकर, महिला जिल्हाध्यक्षा अनिता कदम, शिरूर तालुकाध्यक्ष शरद जाधव, तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय तरटे व कुंडलिक वायकुळे शिरूर शहर अध्यक्ष मनेष सोनवणे, प्रहार पतसंस्था शिरूरचे संस्थापक तुषार हिरवे, चेअरमन प्रविण बेंद्रे, डेप्युटी चेअरमन अलिया तिरंदाज, संचालीका उज्ज्वला गाडेकर, निचितबाबा, शहर महिला अध्यक्षा नयना परदेशी, फरजाना शेख, सचिव गणेश कचरे, शहर महिला उपाध्यक्षा वंदना रामगुडे, वंदना शिरतोडे, ज्योती हिवरे, शिक्रापूर अध्यक्ष सुरेश पाटील, तळेगाव ढमढेरे अध्यक्ष रामभाऊ भुजबळ, रोहिदास ढमढेरे, सुनील नरके, नरवडे, पाबळ अध्यक्ष जगताप, केंदूर अध्यक्ष अभिमन्यू थिटे, विठ्ठल थिटे, ताथवडे, वैभव झांजे, न्हावरे अध्यक्ष बाळकृष्ण कुटे, ता.कार्याध्यक्ष सौरव पडवळ, सामाजिक कार्यकर्त्या नम्रताताई गवारे, तसेच प्रहारची शिरूर तालुका कार्यकारिणी, प्रहार पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ, शेकडो प्रहार दिव्यांग कार्यकर्ते व प्रहार सेवक उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *