सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा : पोलिसांनी केले तरुणांवर गुन्हे दाखल

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
०६ जुलै २०२२

शिरूर


सध्या तरुणाई वाईट मार्गाने जात असल्याचे पाहायला मिळतेय. त्यांची वेशभूषा व वागण्यावरून ते दिसून येते. त्यातलाच एक प्रकार शिरूर शहरातील निर्माण प्लाझा ते मार्केट यार्ड रोड वरील, जुन्या कोर्टाच्या मागील गेटजवळ मंगळावर दि. ०५ जुलै २०२२ रोजी, दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडलाय. यामाहा कंपनीच्या मोटार सायकल वर केक ठवून, रस्त्यावरच केक कापायचे काम चालू होते. परंतु काही सतर्क नागरिकांनी याबाबत शिरूर पोलिसांशी संपर्क साधला असता, शिरूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी तात्काळ गोपनीय अंमलदार राजेंद्र गोपाळे व अन्य काही पोलिसांना तेथे पाचारण करत, संबंधित तरुणांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. यात भूषण चत्तर सह त्याच्या ८ ते १० मित्रांवर भा द वी कलम २८३, १४३, १४७, १४९ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११०, ११२, ११७ प्रमाणे कायदेशीर गुन्हे दाखल केलेले आहेत.

तसेच शिरूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी नागरिकांना आवाहन केलेय की, “कोणाही तरुणांनी अथवा शाळेच्या विद्यार्थ्यांनी सार्वजनिक जागेवर किंवा कोठेही रस्त्यावर वाढदिवस साजरे करू नयेत. तसेच बीगर परवाना व बेदरकरारपणे वाहन चालवू नयेत. तसे आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे भविष्यात त्यांना पासपोर्ट काढताना, शासकीय नोकरि व इतर काही शासकीय कामांवेळी अडचण येतील. त्यामुळे या बाबींकडे पालकांनी गांभीर्याने लक्ष देऊन, आपापली मुले घराबाहेर गेल्यावर काय कृत्य करतात याकडे लक्ष द्यावे.” शिरूर पोलिसांच्या वरील आवाहनाला आजची तरुणाई व जागृत पालक किती गांभीर्याने घेतात व असे प्रकार कितपत थांबतात ? याकडेच शिरूर कारांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

आपला आवाज न्यूज नेटवर्कद्वारे, जिजामाता गार्डन समोरील रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्यांची व्हिडिओ बातमी, मागच्या आठवड्यातच प्रसिद्ध केलेली होती. त्यानंतर शिरूरच्या अनेक जागृत नागरिकांनी या बातमीची दखल घेत, शिरूर पोलिसांनी अशा गावगुंडांना वठणीवर आणण्यासाठी सोशल मीडिया वर चर्चा केलेली होती. तसेच काही जणांनी याचा सतत पाठपुरावाही केलेला होता. तसेच शिरूर येथील जुन्या काही दबंग पोलीस व पोलीस अधिकाऱ्यांच्याही आठवणी त्यानिमित्ताने काढत, मोठ्या चर्चा घडलेल्या होत्या. त्यामुळे शिरूर पोलीस ऍक्शन मोड मध्ये दिसून आली व कारवायांचा धडाका सुरू केलेला दिसून येत आहे. कारण त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, नगर पालिकेच्या नवीन इमारतीसमोरील रस्त्यावर, एका दिवंगत कुख्यात तरुण गुंडाच्या स्मृतिनिमित्त, काही तरुणांनी बाईक रॅली काढून, लोकांमध्ये दहशत निर्माण होईल, अशा प्रकारचे सार्वजनिक ठिकाणी दुष्कृत्ये केलेली होती. त्यामुळे पोलिसांनी तेथे जाऊन काही जणांवर कायदेशीर कारवाई केलेली होती, तर काही अज्ञात ८ ते १० जण होते, ते मात्र फरार झाले होते. मात्र या ८ ते २० जण फरार झालते त्यांचा शोध लागला की नाही, हे मात्र अजूनही समजू शकले नाही. त्यामुळे तापसीय अधिकारी या घटनांचे सी सी फुटेज तपासून, या सर्व घटनांतील इतर फरारांचा शोध लावून, त्यांच्यावर कारवाया करणार का ? असे प्रश्न शिरूरचे जागृत नागरिक विचारू लसगलेत. त्याचप्रमाणे, आता शिरूर शहरातील रस्त्यांची कामे चांगल्या प्रकारे झाल्याने, काही तरुण बाईक स्वार हिरोगीरी करत आपल्या बाईक वर विनाकारण घिरट्या घालताना दिसून येत आहेत. तसेच सर्वच शाळा, कॉलेज व विविध कोचिंग क्लासेसच्या जवळ असे टघे थांबत आहेत. त्यामुळे पालकांची व विशेषतः मुलींच्या पालकांची डोकेदुखी वाढत असून, अशा टघ्यांच्या तक्रारी करायच्या तरी कुणाकडे ? पोलिसांकडे की शाळा व क्लासकडे ? असा प्रश्न पालकांच्या मनात निर्माण होत आहे.

शिवाय शहरातील काही खाजगी कोचिंग क्लासेसना, स्वतःची पार्किंग किंवा ज्या ठिकाणी क्लास घेतात, त्या ठिकाणच्या इमारतींना तेवढ्या प्रमाणात पार्किंग नसल्याने, अशी वाहने चक्क डांबरी रस्त्यावरच पार्क केल्याने व रस्त्यावर वाहतुकीस अडथळा येत असल्याने, रस्त्यावरील वाहन चालकांमध्येच वादावाद होताना दिसत आहे. तर काही नागरिकही आपली स्वतःची चारचाकी वाहने रस्त्यावरच पार्क करत, सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहेत. या सर्वच बाबतच्या अनेक तक्रारी, फोटो व व्हिडिओसह आपला आवाज न्यूज नेटवर्ककडे आलेल्या आहेत. सध्या गाजत असलेले मुसेवाला हत्याकांड प्रकरण ताजे असतानाच, सध्याच्या तरुणाईला वेळेतच पालकांनी आवर घातला नाही, तर ही तरुणाई वाईट वळणावर जाण्यास वेळ लागणार नाही.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *