विवाह सोहळ्यामुळे वधूसह १२ कोरोना बाधित, तर वधू च्या आजीचा मृत्यू
लग्न कार्यमालक, कार्यालय मालक व व्यवस्थापकावर गुन्हा दाखल
नारायणगाव :– ता.२५ (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या नियमांचे धिंडवडे काढीत शाही विवाह सोहळा नुकतच जुन्नर तालुक्यात पार पडला. मात्र या सोहळ्यामुळे वधूसह १२ रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्या पैकी वधूची आजी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
नारायणगाव पोलिसांनी वर पिता सह्याद्री भिसे आणि ओसारा हॉटेल चे मालक व व्यस्थापक यांच्यावर काल दि. २४ रोजी रात्री गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत नारायणगांव पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार भिसे यांच्या मुलाचा विवाह सोहळा १३ ऑगस्ट रोजी हिवरे तर्फे नारायणगांव येथील ओसारा हॉटेल मध्ये झाला. भिसे हे येडगांव येथील सदन शेतकरी,नारायणगाव येथील प्रतिष्ठित व्यापारी आहेत. त्यामुळे या विवाह सोहळ्यासाठी राजकीय कार्यकर्ते,राजकीय आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. या विवाह साठी उपस्थित असलेली वधूची आजी यांचे उपचार सुरु असतांना पुण्यात निधन झाले. त्यानंतर वधूसह लग्नसोहळ्यातील दोन्ही कुटुंबातील अकरा जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सोशल मेडीया म्हणजेच समाज माध्यमांवर झालेल्या या बहूचर्चित महितीची शहानिशा करण्यासाठी नारायणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी थेट हॉटेल ओसारा गाठले तेथील रजिस्टर तापसले असता त्यात उपस्थितांच्या यादीत कोरोना बाधित व्यक्तींची नावे आढळून आली. त्यामुळे कार्यमालक भिसे आणि ओसारा होटेलचे मालक यांचेवर भा. दं. वि. कलम १८८,२६९,२७० कलमान्वये कोविड -१९ उपाययोजना २०२० नियम २,३,४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी सह्याद्री भिसे यांच्या घरातील व्यक्तींचे व त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी पाठवले आहेत.