विधवा प्रथेला हद्दपार करण्याचा उदापुरच्या ग्रामसभेत ठराव.

कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी
३१ मे २०२२

उदापूर


महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी सामाजिक व शासकीय स्तरावर नेहमीच प्रयत्न केले जातात त्यातच एक पाऊल पुढे टाकत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवकालीन मूळ सज्जाचे गाव उदापुरला “विधवा प्रथा बंद करण्याचा” ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे गावातील विधवा महिलांना सामान्य महिलांप्रमाणे जीवन जगण्याचा हक्क प्राप्त झाला आहे.विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेणाऱ्या उदापुर गावाचे जुन्नर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी स्वागत व कौतुक करण्यात येत आहे.

शासनाने विधवा महिलांना मान सन्मान दिला जावा, समाजात विधवांना जे दुय्यम स्थान दिले जाते, महिला विधवा झाल्या नंतर ज्या काही अनिष्ट प्रथा त्यांच्यावर लादल्या जातात त्यात त्यांना सन्मानाची वागणूक न देणे,शुभप्रसंगी त्यांना बहिष्कृत करणे,या व यासारख्या अनेक प्रथा बंद करण्यासाठी शासनाने सर्वच गावातील ग्रामसभेत विधवा प्रथा बंद करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत त्यानुसार जुन्नर तालुक्यातील उदापुर गावात विधवा प्रथेला मूठमाती देऊन विधवा प्रथा बंदीचा एकमुखी ठराव महिला ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.

महाराष्ट्र सरकारने १७ मे २०२२ रोजी विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला यानुसार पतीच्या निधनानंतर पत्नीच्या पायातील जोडवे काढणे,हातातील बांगड्या फोडणे,गळ्यातील मंगळसूत्र काढणे यासारख्या अनेक वर्षे छळत आलेल्या व कालबाह्य झालेल्या प्रथेला कायमस्वरूपी मूठमाती देण्यात आली.याच निर्णयाचे स्वागत करत उदापुर गावाने मंगळवार दिनांक ३० मे रोजी महिलाग्रामसभा उपसरपंच डॉ. पुष्पलता शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी या विधवा प्रथेसह कचरा व्यवस्थापन,१५वा वित्त आयोग निधी अंतर्गत महिला प्रशिक्षण, वृक्षारोपण, नवीन बचतगट सुरू करणे इत्यादी विषयांचे ठराव देखील मंजूर करण्यात आले.यावेळी सरपंच सचिन आंबडेकर, ग्रामपंचायत सदस्य विनोद भोर, राजेंद्र कुलवडे,निलेश नारूडकर, पूनम शिंदे,चैत्राली शिंदे,छाया चौधरी, जयश्री अमूप, वैशाली शिंदे,क्रांतीज्योती महिला बचतगटाच्या अध्यक्ष कविता भोर,वर्षा वलव्हणकर,जयश्री होनराव,ग्रामसेवक प्रशांत जोरवर, सखाराम भले,भूषण वैद्य, शुभम गायकवाड आदी मान्यवर आणि असंख्य महिला उपस्थित होते.

आता गावातील विधवा महिलांना सामान्य महिलांप्रमाणे आपले जीवन जगता येणार आहे.ग्रामपंचायतच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या विविध योजनाद्वारे या सर्व महिलांचे सबलीकरणकरण्यावर भर दिला जाईल,यापुढे गावातील महिलांना पतीच्या निधनानंतर हातातील बांगड्या,पायातील जोडवे,गळ्यातील मंगळसूत्र काढण्यात येणार नाही.त्यांच्या कपाळावर सौभाग्यवतीचे लेणे असलेले कुंकूपूर्वीप्रमाणेच राहील,सर्वच धार्मिक व सामाजिक शुभ कार्यात सहभाग घेऊन त्यांचा मान सन्मान ठेवण्यात येईल.  डॉ. पुष्पलता शिंदे :-उपसरपंच उदापुर ता:-जुन्नर ,जि:-पुणे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *