पालखी सोहळ्याच्या आगमनाचे आणि मुक्कामाचे सुरेख नियोजन करणार – आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२३ मे २०२२  

पिंपरी


वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध व्यवस्था आणि सोयीसुविधा उपलब्ध करून देत असताना  महापालिका आत्मीयतेने आणि आनंदाने सहभागी होऊन पालखी सोहळ्याच्या आगमनाचे आणि मुक्कामाचे  सुरेख  नियोजन करणार असून याबाबत कोणतीही अडचण उद्भवणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल, असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले.  महापालिकेने सुरु केलेल्या स्वच्छाग्रह मोहिमेला प्रतिसाद देत पर्यावरणाच्या दृष्टीने यंदाची वारी प्लास्टिकमुक्त निर्मलवारी होण्यासाठी वारक-यांनी  सहकार्य करावे असे आवाहनही आयुक्त पाटील यांनी केले.

यावर्षीच्या आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त आयुक्त राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये नियोजन बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख, पोलीस, महापालिका, वीज वितरण कंपनी, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. यामध्ये संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, विश्वस्त भानुदास महाराज मोरे, संत ज्ञानेश्वर  महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त प्रा.डॉ.अभय टिळक, माजी नगरसेवक प्रमोद कुटे, पोलीस उपआयुक्त मंचक इप्पर, महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल रॉय, सहशहर अभियंता श्रीकांत सवने, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, उपायुक्त सुभाष इंगळे, सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके, मोटार वाहन निरीक्षक अनिल वैरागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, वीज वितरण विभागाचे एम.बी. चौधरी, भुजंग बाबर, उदय भोसले, सोमनाथ पाताडे, सतीश केदार, उमेश कवडे, ,पोलीस अधिकारी दिलीप शिंदे, वर्षाराणी पाटील, भास्कर जाधव, वाहतूक शाखेचे दीपक साळुंके आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालखी सोहळा प्रमुखांनी बैठकीत विविध सूचना मांडल्या. यामध्ये पालखी मार्गावरील राडारोडा उचलावा, पालखी मार्गावरील खड्डे बुजवावे, मुक्काम, पालखी प्रवास आणि विसाव्याच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची तसेच फिरत्या शौचालयांची पुरेशी व्यवस्था करावी, मुक्कामाच्या ठिकाणी वारक-यांसाठी  आंघोळीची सोय असावी, सोहळ्यासाठी पुरेशी  पोलीस सुरक्षा असावी, दिंड्यांच्या स्वागतासाठी घेण्यात येणा-या भेटवस्तू ऐवजी वृक्षारोपन करावे तसेच पालखी सोबत पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन आदी सुविधा द्याव्यात, तळवडे येथे स्वागत कमान उभारावी, आळंदी येथे फिरत्या शौचालयांची व्यवस्था पुरवावी आदी सूचनांचा समावेश होता. पालखी सोहळ्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांचे उत्तम सहकार्य मिळते. यंदा अभूतपूर्व सोहळा होणार आहे. शिवाय मोठ्या संख्येने वारकरी आणि भाविक यात सहभागी होतील अशी शक्यता असल्याने विविध सोयीसुविधा कमी पडू नये याची दक्षता प्रशासकीय यंत्रणेने घ्यावी असेही पालखी सोहळा पदाधिका-यांनी यावेळी बैठकीत  सांगितले.


पोलीस उपआयुक्त मंचक इप्पर म्हणाले, पालखी सोहळ्यानिमित्त होणारी  संभाव्य वारक-यांची आणि भाविकांची संख्या   विचारात घेऊन पोलीस यंत्रणेने कायदा व सुव्यवस्था आणि सुरक्षेचे नियोजन केले आहे. अधिकची पोलीस कुमक बंदोबस्तासाठी तैनात केली जाणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पुरेपूर  खबरदारी घेतली जाईल. अनेकवेळा दुर्घटना घडत असते, ते विचारात घेऊन  शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार  बंदोबस्ताचे नियोजन आम्ही केले आहे. वारक-यांना वाटप केल्या जाणा-या  वस्तू अथवा अन्नपदार्थ यांचे वितरण एकाच ठिकाणाहून झाल्यास गर्दी टाळता येईल. त्यामुळे पालखी सोहळा सुरळीत पुढे जाण्यासाठी अडथळा निर्माण होणार नाही, असे इप्पर म्हणाले. पालखी मार्गावर हॉकर्सचे अतिक्रमण करू नये, रस्त्यांची सुरु असलेली कामे लवकर मार्गी लावावे, चालू बांधकामाच्या ठिकाणी बॅरीकेटस लावावे अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

पिंपरी चिंचवड शहरवासीयांसाठी हा पालखी सोहळा  आनंदाची पर्वणी घेऊन येत असतो. त्यामुळे या सोहळ्याच्या आगमनाची सर्वजण  प्रतीक्षा करत आहेत. यंदा अधिक संख्येने वारकरी तसेच भाविक सोहळ्यासाठी जमणार असल्याची शक्यता आहे, त्यादृष्टीने महापालिकेने नियोजन करण्याचे ठरवले आहे, असे नमूद करून आयुक्त राजेश पाटील म्हणाले, वारीचा प्रवास सुरळीत होण्यासाठी पालखी मार्गावरील अतिक्रमणे आणि इतर गोष्टींचे नियोजन केले जाईल. देहू नगर पंचायत आणि आळंदी नगर परिषदेला  लागणारे आवश्यक सर्व सहकार्य महापालिका करणार आहे. पालखी आगमन काळात पोलीस, वीज वितरण, महापालिका यांसह विविध प्रशासकीय यंत्रणा काम करत असतात, त्यांच्यामध्ये समन्वय राहावा यासाठी कंट्रोल रूम  उभारली जाणार असून  महापालिकेच्या वतीने समन्वयासाठी  सक्षम अधिका-याची नेमणूक केली जाईल. त्यामुळे दोन्ही पालखीसमवेत समन्वय राखता येईल. शिवाय पिण्याच्या पाण्याची व्यवस्था  तसेच फिरती शौचालये याबरोबर मुक्कामाच्या ठिकाणी उत्तम दर्जाची सुविधा महापालिकेच्या वतीने करण्यात येईल.

आकुर्डीमध्ये पालखी मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांच्या निवासासाठी अद्यावत वारकरी भवन उभारणीसाठी महापालिका प्रयत्नशील असून लवकरच हे भवन उभे राहील. बैठकीत आलेल्या सूचना आणि मागण्या विचारात घेऊन नियोजनाची कार्यवाही केली जाईल. यावर्षी पालखी सोहळ्यानिमित्त महापालिकेच्या वतीने  केले जाणारे नियोजन निश्चितपणे चांगल्या स्वरूपाचे राहील, अशी ग्वाही आयुक्त पाटील यांनी यावेळी दिली. बैठकीचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *