अजितदादांवर आरोप म्हणजे चंद्रकांत पाटलांना सुचलेली ‘विनाशकाले विपरीत बुध्दी’ – विलास लांडे

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२२ ससेप्टेंबर २०२१

पिंपरी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील टिकेला लांडे यांचे प्रत्युत्तर

तब्बल 105 आमदार खिशात असून सुध्दा सरकार बनविण्यात आपयशी ठरलेल्या फडणविसांना खूश करण्यासाठी भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचा आयता मतदार संघ बळकाऊन स्वतःला बलाड्य राजकीय व्यक्तीमत्व समजणा-या पाटलांनी शोभेल आणि झेपेल तेवढेच बोलावे. गेली तीन दशके मंत्रीमंडळातील प्रमुख पदांवर राहून राज्याचे नेतृत्व यशस्वीपणे सांभाळणा-या अजितदादांवर आरोप करणे म्हणजे पाटलांना सूचलेली ‘विनाशकाले विपरीत बुध्दी’च म्हणावी लागेल. ‘आईजीच्या जिवावर बाईजी उधार’ झालेल्या पाटलांचा आरोप म्हणजे शरद पवार साहेबांनी भाजपाला सत्तेपासून कोसो दूर ठेवल्यामुळे बाहेर पडणारी खदखद आहे, असा सडेतोड आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी केला आहे.

अजितदादांवर आरोप करण्यापूर्वी पाटलांनी स्वतःचे आत्मपरिक्षण करावे

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टिका केली. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे दबंग नेते आहेत. ते शंभर अजित पवार खिशात घेऊन फिरतात, अशी टिका त्यांनी केली होती. त्यावर भोसरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार विलास लांडे यांनी आज या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, राज्यात भाजपची सत्ता असताना चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर महापालिकेत पक्षाची एकहाती सत्ता आणता आली नाही. केवळ 13 नगरसेवक निवडून आणल्यामुळे कोल्हापुरात आपल्या राजकीय अस्तित्वाची लढाई अपयशी ठरल्यानंतर त्यांनी पुण्यातील कोथरुड मतदार संघावर दावा ठोकला. माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या आयत्या मतदार संघात शिरकाव करून विजयी ठरलेले पाटील हे आयत्या बिळावर बसलेल्या नागोबाप्रमाणे राजकीय स्थिरता राखून आहेत. अजित पवार यांना नागरिकांनी सलग सहावेळा विधानसभेवर निवडून दिले आहे. त्यांचे नेतृत्व लोकमान्य आहे. महत्वाच्या पदांवर राहून त्यांनी महाराष्ट्र घडविण्यासाठी योगदान दिले आहे. त्यांच्यावर बोलण्याअगोदर पाटील यांनी स्वतःच्या राजकीय अस्तित्वाचे मूल्यमापन करावे, असे लांडे यांनी म्हटले आहे.

अजितदादा सहावेळा विधानसभेवर निवडून आले

भाजपकडे 105 आमदार असताना सुध्दा फडणविसांना राज्यात सत्ता स्थापन करता आली नाही. त्यामुळे भाजपाच्या आमदारांचा तोल जाऊ लागला आहे. फडणविसांची मर्जी राखण्यासाठी अजितदादांवर टिका केली जात आहे. अजितदादा सहावेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यांनी संपूर्ण राज्याचे नेतृत्व यशस्वीपणे केले आहे. त्यांच्या नेतृत्वाला लोकमान्यता प्राप्त झालेली आहे. फडणविस यांच्यापेक्षा कित्येक पटीने अधिक अजितदादांचे नेतृत्व लोकप्रिय ठरले आहे. त्यामुळे उगाच बाष्फळ बडबड करून पाटलांनी स्वतःची खिल्ली उडवून घेऊ नये. अजितदादांवर आरोप करण्याअगोदर त्यांनी आत्मचिंतन करावे. दादांवर टिका करण्याची पाटलांची अजिबात योग्यता नाही, अशा शब्दांत लांडे यांनी चंद्रकांत पाटलांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *